*स्वागताध्यक्ष संजय गुरव : कृतीशील नेतृत्वाचा सन्मान*
*बेळगाव साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी संजय गुरव*
*बेळगाव, दि. २३ :* ७ व्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाच्या _स्वागताध्यक्षपदी_ कुद्रेमनी येथील साहित्यप्रेमी व अ. भा. मराठी साहित्य परिषदेचे सहसचिव _संजय ईश्वर गुरव_ यांची निवड करून परिषदेने त्यांच्या निस्वार्थ कार्याचा यथोचित सन्मान केला आहे.
संजय गुरव हे कुद्रेमनी येथील म. ए. समितीचे ज्येष्ठ नेते _कै. ईश्वर गुरव_ यांचे सुपुत्र आहेत. सध्या ते मराठा बँकेत शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत असून, नोकरी सांभाळून साहित्य व सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. कुद्रेमनी येथील _बलभीम साहित्य संमेलनाचे ते संस्थापक सदस्य_ आहेत.
संजय गुरव यांची ओळख म्हणजे _“कमी बोलणं, पण कार्य जास्त करणं”_. साहित्याशी सातत्याने जोडलेले राहून विविध उपक्रमांत ते नेहमी अग्रभागी असतात. व्यासपीठावर न मिरवता पडद्यामागे राहून संमेलन यशस्वी करण्यासाठी झटणे हा त्यांचा स्वभावगुण आहे. म्हणूनच यंदा संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाचा मान त्यांना देण्यात आला.
स्वागताध्यक्ष म्हणून बोलताना संजय गुरव म्हणाले, _”सीमाभागातील हे साहित्य संमेलन म्हणजे आमची उर्जा स्थाने आहेत, आमचा अभिमान आहे. येथील संस्कृती, परंपरा आणि मराठी अस्मितेचा आम्हा सीमावासियांना सार्थ अभिमान आहे. या मातीतील प्रत्येक शब्दाला, प्रत्येक कवितेला आम्ही जपतो. उद्याच्या संमेलनात सर्व साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपली मराठी अस्मिता दाखवून द्यावी, हीच विनंती.”_
७ व्या संमेलनाच्या यशात स्वागताध्यक्ष संजय गुरव यांचा मोलाचा वाटा असणार यात शंका नाही. त्यांच्या शांत, संयमी व कृतीशील नेतृत्वाला सलाम!
