*७ व्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटकपदी उद्योजक आप्पासाहेब गुरव यांची निवड*
*पहिल्या संमेलनापासून सलग सातव्या वर्षी उद्घाटकपदाचा मान*
*बेळगाव (प्रतिनिधी ) दि.22 :* येत्या रविवार, दि. २४ मे २०२६ रोजी मराठा मंदिर, बेळगाव येथे छ. शिवाजी महाराज साहित्य नगरीत होणाऱ्या *७ व्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटकपदी* मराठा मंदिरचे अध्यक्ष, प्रसिद्ध उद्योजक व ज्येष्ठ समाजसेवक *मा. आप्पासाहेब गुरव* यांची एकमुखाने निवड करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, २०२० साली भरलेल्या पहिल्या बेळगाव मराठी साहित्य संमेलनापासून ते आजतागायत *सलग सात वर्षे उद्घाटक म्हणून सन्मान* मिळवणारे आप्पासाहेब गुरव हे सीमाभागातील एकमेव व्यक्तिमत्व ठरले आहेत. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच औद्योगिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाच्या पार्श्वभूमीवर ही निवड करण्यात आल्याचे साहित्य परिषदेचे राज्याध्यक्ष सीमाकवी रवींद्र पाटील व जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण यांनी सांगितले.
*आप्पासाहेब गुरव* हे केवळ बेळगाव नगरीतील नामवंत उद्योजक नाहीत, तर समाजसेवा, शिक्षण, संस्कृती व राजकीय क्षेत्रात सक्रिय योगदान देणारे कृतीशील नेतृत्व आहे. प्रसिद्धीमागून दूर राहून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तींपैकी ते एक आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली ६५ हजारांहून अधिक मोफत नेत्र शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत. बेळगाव फाउंड्री क्लस्टर, जिल्हा हॉकी संघटना, जिल्हा शरीरसौष्ठव संघटना आदी संस्थांशी ते सक्रियपणे जोडलेले आहेत.
मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीच्या जतनासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. बेळगाव शहरात पहिल्यांदाच जिजाऊ जयंती साजरी करण्याचा संकल्प त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केला. चंदगड-कोवाड भागातील पुरग्रस्तांसाठी मोठी मदत त्यांनी पुरवली आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून सीमाभागातील मराठीच्या हक्कासाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला आहे.
संघटन कौशल्य आणि सामाजिक बांधिलकी जपणारे परिपूर्ण नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. आप्पासाहेब गुरव यांच्या उद्घाटकपदामुळे संमेलनाला नवी उंची मिळेल आणि मराठी साहित्य, संस्कृती व समाजसेवेला बळ मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
*संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक यशवंत पाटणे भूषविणार* असून संमेलनाच्या यशस्वीतेसाठी जय्यत तयारी सुरू आहे.
