Spread the love

कन्नड सक्ती थांबवा, मराठीला न्याय द्या” – सीमाभाग युवा समितीची खासदार शेट्टर यांच्याकडे ठाम मागणी

बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिक अल्पसंख्यांकांना त्यांच्या मातृभाषेत शासकीय सेवा उपलब्ध करून द्याव्यात व कन्नड सक्तीचा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा, अशी ठाम मागणी युवा समिती सीमाभागच्या वतीने बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

अलीकडेच पार पडलेल्या कन्नड प्राधिकरणाच्या बैठकीत राज्यात सर्वत्र कन्नड भाषेचा सक्तीने वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय सीमाभागातील मराठी भाषिक जनतेस अन्यायकारक असून, भारतीय संविधानातील अनुच्छेद 29(1), 350A, 350B तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांना विरोधात जाणारा असल्याचा ठपका समितीने ठेवला.

युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी खासदार शेट्टर यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले की, भाषिक अल्पसंख्यांकांच्या हक्कांचे रक्षण करणे ही शासनाची जबाबदारी असून, मराठी भाषिक बहुल बेळगाव मतदारसंघातील जनतेचा हा हक्क सरकारने तत्काळ मान्य केला पाहिजे.

यावेळी खासदार शेट्टर यांनी मराठी भाषिकांवर अन्याय होणार नाही याची हमी देत, जिल्हाधिकारी यांच्यासोबत उद्याच विशेष बैठक घेऊन प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.

या निवेदनावेळी कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे, खजिनदार व नगरसेवक शिवाजी मंडोळकर, नारायण मुंचडीकर, महादेव पाटील, शिवाजी हावळाण्णाचे, चंद्रकांत पाटील, विजय जाधव, रमेश माळवी, अशोक डोळेकर, वैराळ सुळकर, अभिषेक कारेकर, जोतिबा येळ्ळूरकर, चेतन पेडणेकर, रिचर्ड्स अँथोनी, महेंद्र जाधव, सुरज जाधव, गणेश मोहिते, शुभम जाधव, मोतेश बारदेशकर, किरण मोदगेकर, अशोक घागवे आदी उपस्थित होते.