
- किणये येथे भीषण अपघात – कॅन्टर क्लीनरचा जागीच मृत्यू, चालक जखमी
बेळगाव – गोव्याला भाजीपाला वाहतूक करणाऱ्या कॅन्टरने रस्त्याच्या कडेला निष्काळजीपणे उभ्या केलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास बेळगाव-जांबोटी रोडवरील किणये गावाच्या हद्दीत घडली.
या भीषण अपघातात मधु कल्लाप्पा अष्टेकर (वय ४०, रा. बिजगर्णी, ता. बेळगाव) या कॅन्टरमधील क्लीनरचा जागीच मृत्यू झाला. तर चालक शुभम चौगुले (रा. बिजगर्णी) हा किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
कॅन्टर हे वाहन बेळगाव येथून गोव्यामार्गे भाजीपाला घेऊन जात होते. दरम्यान, किणये गावाजवळ एका ट्रकने रस्त्यावरच निष्काळजीपणे पार्किंग केल्यामुळे समोरून येणाऱ्या कॅन्टरचालकाला ट्रकचा अंदाज न आल्याने कॅन्टर थेट ट्रकला धडकली. या धडकेत क्लीनरचा दुर्दैवी मृत्यू झाला.
स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत कार्य सुरू केले. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.