
जीवनविद्या मिशनच्या वतीने गुरुपौर्णिमेला कृतज्ञता दिन महोत्सव; बेळगावात होणार भव्य कार्यक्रम
बेळगाव : सदगुरु श्री वामनराव पै प्रणित जीवनविद्या मिशन, ज्ञानसाधना केंद्र बेळगाव यांच्या वतीने गुरुपौर्णिमा निमित्त कृतज्ञता दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य सोहळा रविवार, 20 जुलै 2025 रोजी सकाळी 8.30 ते दुपारी 2.00 या वेळेत मराठा मंदिर, रेल्वे ओव्हर ब्रिजजवळ पार पडणार आहे.
- कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानेश्वर माउलींच्या हरिपाठाने होणार असून त्यानंतर संगीत जीवनविद्या, गुरुपूजन, मानसपूजा आणि प्रबोधन सत्र होणार आहे. प्रबोधनासाठी सदगुरुंचे शिष्य श्री. चंद्रकांत निंबाळकर (पुणे) हे ‘खऱ्या सदगुरूंची गरज’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
प्रबोधनानंतर अनुग्रह व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बेळगाव, खानापूर, गडहिंग्लज, गोवा परिसरातून शेकडो साधक उपस्थित राहणार आहेत.
हा कार्यक्रम विनामूल्य असून सर्वांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन जीवनविद्या मिशन बेळगाव शाखेचे अध्यक्ष शैलेश शिरोडकर यांनी केले आहे.