
भाजप संकल्पपूर्वती सभा उत्साहात संपन्न : रक्तदानातून 127 जीव वाचवणारे सुपरवायझर संजय पाटील यांचा गौरव
बेळगाव (दि. 18 जुलै 2025) – टिळकवाडी येथील लायन्स क्लब भवन येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने “संकल्पपूर्वती सभा” आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमात पक्षाच्या कार्यपद्धतीसह केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमास भाजप दक्षिणचे प्रभारी श्री. महादेव दरेणावर, सचिन कणबरगी, नगरसेवक श्री. नंदू मिरजकर, तसेच वार्ड क्रमांक 44 चे लोकप्रिय नगरसेवक श्री. आनंदराव चव्हाण हे मान्यवर उपस्थित होते. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी भाजपने जनतेच्या हितासाठी राबविलेल्या योजनांचा आढावा घेत नागरिकांना पक्षाशी जोडण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात खास आकर्षण ठरले ते म्हणजे महानगरपालिकेतील सुपरवायझर श्री. संजय पाटील यांचा गौरव. त्यांनी आजवर 127 वेळा रक्तदान करून अनेक रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. त्यांच्या या अतुलनीय कार्याची दखल घेऊन भारतीय जनता पक्षाच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
या वेळी राहुल कांबळे, मंदार उचगावकर, वासुदेव कुलकर्णी, वसंत हेबाळकर यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात मान्यवरांनी संजय पाटील यांच्या समाजहितकारक कार्याचे जोरदार कौतुक केले. त्यांच्या रक्तदानाच्या कार्यातून समाजाला प्रेरणा मिळते, असे गौरवोद्गार काढण्यात आले.
गुणगौरवाच्या भाषणांनंतर समारोपाच्या भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली.