
शहापूर गणेशोत्सव मंडळांची बैठक २७ जुलै रोजी — सुरळीत उत्सवासाठी शिस्त व सुरक्षा नियोजनावर भर
बेळगाव (शहापूर) – आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती श्री गणेशोत्सव महामंडळाच्या शहापूर विभागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची एक महत्त्वपूर्ण बैठक रविवार, दि. २७ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५:०० वाजता बलभीम व्यायाम मंडळ सांस्कृतिक भवन, नवी गल्ली, शहापूर येथे आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीमध्ये शहापूर, होसूर, खासबाग, भारत नगर, वडगांव, जुने बेळगांव आदी भागांतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार असून, यावेळी मंडळांनी घ्यावयाच्या खबरदाऱ्या, सार्वजनिक ठिकाणी शिस्त व स्वच्छता राखणे, देखाव्यांमधील ध्वनीप्रदूषणाचे प्रमाण कमी ठेवणे, विसर्जन मिरवणुकीतील शिस्तबद्धता आणि शांतता राखणे यासह महत्त्वाच्या बाबींची चर्चा होणार आहे.
विशेष म्हणजे, या बैठकीत पोलिस विभागाकडून मिळणारी मदत, बंदोबस्त, आपत्कालीन सेवा यांचेही मार्ग निश्चित करण्यात येणार आहेत. यामुळे उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सामूहिक नियोजनाला गती मिळणार आहे.
महामंडळाचे अध्यक्ष श्री. नेताजी जाधव, कार्याध्यक्ष रमेश सोंटक्की, उपाध्यक्ष अशोक चिंडक व इतर पदाधिकाऱ्यांनी सर्व गणेशोत्सव मंडळांनी वेळेवर व पूर्ण उपस्थितीत या बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन केले आह.