
शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात ‘संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’चा जोरदार नारा!
कोल्हापूरमध्ये शिवसेनेचा निर्धार मेळावा उत्साहात पार; प्रमुख नेत्यांचा भव्य सत्कार
कोल्हापूर | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कोल्हापूर येथे भव्य निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला हजारो शिवसैनिक आणि महाराष्ट्रप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमात महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढा देणाऱ्या विविध स्तरातील शिवसेना नेत्यांनी आपली ठाम भूमिका मांडत, “बेळगाव-कारवार-निपाणी-बिदर-भालकी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!” असा जोमदार नारा दिला. या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
या निर्धार मेळाव्यात शिवसेना नेते व सचिव आदरणीय विनायक राऊत, गटनेते आमदार सुनील प्रभू, शिवसेना उपनेते आणि कोल्हापूर-सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवाडकर, शिवसेना उपनेते नितीन बानुगडे पाटील, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, कोल्हापूर जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील शिंत्रे, बेळगाव जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, उपजिल्हाप्रमुख महेश टंकसाळी, तसेच विभागप्रमुख विजय सावंत आणि रमेश माळवी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
मेळाव्यात शिवसेनेच्या विचारसरणीचा ठाम पवित्रा मांडत, सीमाभागात महाराष्ट्रावरील अन्यायाविरुद्ध एकत्र लढा देण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते विनायक राऊत आणि आमदार सुनील प्रभू यांचा भव्य सत्कार करण्यात आला. दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्राच्या सीमाभागात लवकरच व्यापक आंदोलन आणि जनजागरण मोहिम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.
शिवसैनिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे कोल्हापूर शहरात मेळाव्याचे स्वरूप एकप्रकारच्या शक्तिप्रदर्शनातच परिवर्तित झाले होते. मराठी अस्मितेसाठी लढा देणाऱ्या शिवसैनिकांनी “संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे”, “महाराष्ट्राच्या सीमाभागावर अन्याय नको”, अशा घोषणांनी वातावरण भारून टाकले. यावेळी बेळगाव मधून दत्ता पाटील राजू बोकडे राजू कनेरी विनायक बेळगावकर भाऊ मासनकर सह शेकडो शिव सेना पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.