
सिमाभागातील मराठी जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आक्रमक! पालकमंत्र्यांना निवेदन सादर
गोकाक (ता. बेळगाव) –
सिमाभागात मराठी भाषिकांवर होत असलेल्या जबरदस्तीच्या कन्नड सक्तीच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने आज मोठे पाऊल उचलले. समितीच्या शिष्टमंडळाने बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. सतीश जारकीहोळी यांच्या गोकाक येथील निवासस्थानी भेट देत याबाबत सविस्तर निवेदन सादर केले.
समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “मराठी भाषिकांवर कन्नड सक्तीचा आदेश अन्यायकारक आहे. सिमाभागातील जनतेच्या भावना धुळीस मिळवणाऱ्या या आदेशाची अंमलबजावणी सिमाभागात होऊ नये.” यासह त्यांनी यावर त्वरित कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आणि या आंदोलनाचे पडसाद दोन राज्यांत उमटतील, अशी स्पष्ट चेतावणी दिली.
या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. “मराठी भाषिकांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे, नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांच्यासह समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.