Spread the love

तालुक्यातील ग्रामपंचायतीवर पेट्रोल बॉम्बचा मारा

बेळगाव तालुक्यातील कलखांब ग्रामपंचायतीच्या इमारतीवर शुक्रवारी रात्री पेट्रोल बॉम्बचा मारा करण्यात आला. तसेच आग लावण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे कार्यालयातील फर्निचरचे नुकसान झाले आहे. सदर प्रकार घडविण्यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेरा काढून टाकण्यात आला आहे. ही बाब शनिवारी स्थानिकांना समजली. काही अज्ञातांनी बाटलीमध्ये पेट्रोल भरून ग्रामपंचायतीच्या खिडकीतून आत फेकले. कागदपत्रांचे कोणतेही नुकसान झालेले नाही. मात्र टेबल व खुर्च्यांचे नुकसान झाले.

चिक्कोडीच्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी शुक्रवारी गावात काही विकासकामांचा शुभारंभ केला. गावातील एका गटाने त्यांना आमंत्रित केले होते. खासदाराला वाल्मिकी गल्लीत आणावे, अशी मागणी दुसऱ्या गटाने केली. या नात्यातून दोन गटांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. ग्रामपंचायतीवर झालेल्या पेट्रोल बॉम्बच्या घटनेचा या गटांमधील घटनेचा संबंध असावा, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. मारिहाळ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला आहे.