Spread the love

लोणावळा येथील भूशी डॅम परिसरात धबधब्यात एका कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची मनसुन्न करणारी घटना घडल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगात अचानक कुठेही पाऊस पडतो. त्यावेळी तेथील पाण्याच्या साठ्यात वाढ होणार आहे याची कल्पना त्या भागात नवीन आलेल्यांना नसते. त्यामुळे धबधब्याचे नदीचे पाणी अचानक वाढत असते. लोणावळ्यातील घटनेचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक जणांना या संकटाची जाणीव नव्याने झाली आहे. सरकारने देखील आता अशा पावसाळी पिकनिक ठिकाणांची झाडाझडती सुरु केली आहे. आता येथून पुढे अशा दुर्घटना टाळल्यासाठी पर्यटकांना आता अशा ठिकाणी जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी कठोर निर्णय घेण्यात आला आहे.

अंबरनाथ तालुक्यातील धबघबे आणि नदी

1) कोंडेश्वर धबधबा, 2 ) भोज, 3 ) दहिवली, 4 ) आंबेशिव नदी 5) चंदेरी गड, 6) चांदप, 7) आस्नोली नदी 8) बारवी नदी,

कल्याण तालुक्यातील या ठिकाणांवर बंदी

1) कांबा, 2) पावशेपाडा, 3 ) खडवली नदी, 4 ) टिटवाळा नदी 5 ) गणेश घाट,

मुरबाड तालुक्यातील ठिकाणे

1) सिद्धगड, 2 ) डोंगरन्हावे, 3 ) सोनाळे 4 ) हरिश्चंद्रगड 5 ) बारवी धरण परिसर, 6 ) पडाळे धरण, 7 ) माळशेज घाट, 8 ) नाणेघाट , 9 ) गोरखगड

भिवंडी तालुक्यातील या केंद्रांवर बंदी

1 ) गणेशपुरी नदी परिसर

शहापूर तालुक्यातील पर्यटन केंद्रं

1 ) भातसा धरण आणि परिसर, 2 ) माहुली किल्ला आणि पायथा, 3 ) अशोक धबधबा, 4 ) आजा पर्वत, 5 ) सापगाव नदी किनारा, 6) कळंबे नदी, 7 ) कसारा घाट आणि घाटातले धबधबे
या पर्यटन स्थळांवर जाण्यास पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे. या परिसरात फौजदारी दंड संहिता सीआरपीसी कलम 144 आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 34 अन्वये हे आदेश लागू करण्यात आले आहेत. हे मनाई आदेश पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी लागू करण्यात आले असून त्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती अंबरनाथच्या तहसीलदार प्रशांती माने यांनी दिली आहे. ठाणे जिल्ह्यात धरण, नदी आणि धबधबे परिसरात जाण्यापूर्वी पर्यटकांनी कुठे बंदी आहे याची माहीती करुनच प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरीतही पाटबंधारे विभागाचे आदेश

लोणावळ्यासारखी घटना घडू नये म्हणून रत्नागिरीचा पाटबंधारे विभाग देखील ॲक्शन मोडमध्ये आला आहे. 68 धरणांना प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना धरण परिसरात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. धरणाच्या सांडव्याच्या ठिकाणी पाटबंधारे विभागाकडून चौकीदारांची नेमणूक करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील चार मोठ्या धरणावर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्यात आली आहे. वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना धरणाच्या पाण्यात उतरवू नये आदेश पाटबंधारे विभागाने दिले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील 21 धरणे ओवर फ्लो झाली आहेत. जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू आहे. लोणावळ्याची दुर्घटना टाळण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून विशेष प्रयत्न केले आहेत. पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता माधव सुर्वे यांनी ही माहीती दिली आहे.

महाराष्ट्राची चिरापुंजी आंबोली घाटातील धबधबे

महाराष्ट्राची चिरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोलीत मुख्य धबधबा, कावळेसाद आणि अन्य ठिकाणी पर्यटकांचा वाढता ओघ लक्षात घेऊन 50 सीसीटीव्ही बसविण्याचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी शासनाकडे सादर केला आहे. यामुळे लवकरच आंबोलीत पोलिसांचा तिसरा डोळा सीसीटीव्हीच्या माध्यमातून उघडणार आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी सदरचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. वर्षा पर्यटनात आंबोलीत होत असलेली पर्यटकांची गर्दी लक्षात घेता याबाबतचं पाऊल पोलिसांकडून उचललं आहे. त्यामुळे अतिउत्साही आणि हुल्लडबाज पर्यटकांना आळा बसविण्यास मदत होणार आहे.

लोणावळ्यात पर्यटकांवर निर्बंध

लोणावळ्यात दोन दिवसांपूर्वी एक दुर्घटना घडली आणि त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. सध्या लोणावळ्यातील पर्यटन स्थळी 2 जुलै ते 31 ऑगस्टपर्यंत सायंकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. भुशी धरण, सहारा रस्त्याच्या समोरील तीन धबधबे, लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट अशा ठिकाणी पर्यटकांना संध्याकाळी 6 नंतर बंदी असणार आहे.