Spread the love

बेळगाव :

महाराष्ट्र राज्यसह जिल्ह्यात होणाऱ्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज गुरुवारी सकाळी घटप्रभा, कृष्णा आणि हिरण्यकेशी नदीपात्रासह तेथील परिसराला भेट देऊन पाहणी केली.
सुतगट्टी येथे घटप्रभा नदी पात्राच्या ठिकाणी दिलेल्या भेटीप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी नदीची सर्वसामान्य पाणी पातळी आणि सध्या वाढलेली पातळी याबद्दल माहिती घेतली. त्यानंतर संकेश्वर येथे जाऊन त्यांनी पुराचा संभाव्य धोका असलेल्या प्रदेशाची पाहणी केली. याप्रसंगी मागील वेळी पुरामुळे या ठिकाणी निर्माण झालेल्या समस्यांबाबत त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच यंदा पुन्हा त्या समस्या उद्भवणार नाहीत या दृष्टीने उपाययोजना करण्याची सूचना रोशन यांनी तहसीलदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना केली.

नदीची पातळी वाढत असताना पुराचा धोका असलेल्या भागात नागरिकांनी जाऊ नये यासाठी संबंधित ठिकाणी इशारा देणारे फलक भरून बॅरिकेट्स घालावेत असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. मागील 2019 मध्ये निर्माण झालेल्या पूर परिस्थितीप्रसंगी स्थापन करण्यात आलेल्या काळजी केंद्रांप्रमाणे यावेळीही तशी केंद्रे स्थापण्यात आली आहेत.

त्याचप्रमाणे पूर परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक उपाययोजना हाती घेण्यात आले असल्याची माहिती हुक्केरीच्या तहसीलदार मंजुळा नायक यांनी यावेळी दिली.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दरवर्षी कृष्णा नदीच्या पुराने प्रभावित होणाऱ्या चिक्कोडी तालुक्यातील मांजरी पुलाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर येडूर गावाच्या ठिकाणी बोटीच्या सहाय्याने नदीपात्राची पाहणी केली. या पाहणी प्रसंगी त्यांनी आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक लोकांच्या आणि जनावरांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
नजीकच्या महाराष्ट्रात व्यापक पाऊस होत असून गेल्या कांही दिवसांपासून आपल्या जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढला असल्यामुळे आपण सावध राहिले पाहिजे. यासाठी नदीच्या पाणी पातळीवर सतत बारीक लक्ष ठेवण्याबरोबरच पूर परिस्थितीला यशस्वी तोंड देण्यासाठी बोटी वगैरे आवश्यक सर्व गोष्टींची सिद्धता केली जावी, असे निर्देश रोशन यांनी दिले.

आपल्या आजच्या पाहणी दौऱ्यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सध्या जिल्ह्यामध्ये पुराचा धोका उद्भवलेला नाही. तथापि खबरदारीचा उपाय म्हणून पूर परिस्थिती हाताळण्यास आवश्यक सर्व ती सिद्धता करण्यात आली असल्याची माहिती दिली.
त्या अनुषंगाने नुकत्याच 26 बोटी सज्ज ठेवण्यात आल्या असून गरज पडल्यास कारवारहून आणखी बोटी मागवल्या जातील असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी चिकोडी उपविभाग अधिकारी बसवराज संपगावी, तहसीलदार कुलकर्णी यांच्यासह महसूल आणि पाटबंधारे खात्याचे अधिकारी उपस्थित होते.