Spread the love

बेळगाव:

खानापूर तालुक्यात जोरदार कोसळत असलेल्या पावसामुळे, नदी, नाले तुडुंब भरले असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पावसामुळे शाळा कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या गोष्टींचा त्रास सहन करावा लागत आहे.
याबाबत खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी, खानापूर तालुक्याच्या शिक्षणाधिकारी राजश्री कुडची यांच्याकडे शाळा कॉलेजना सुट्टी देण्याची मागणी केली होती.

त्यांच्या विनंती वरून शिक्षणाधिकारी राजश्री कुडची, यांनी बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी व बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडे सुट्टी देण्याबाबत शिफारस केली होती. खानापूर तालुक्यात कोसळत असलेल्या पावसाची परिस्थिती लक्षात घेता, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी, खानापूर तालुक्यातील शाळा कॉलेजना शुक्रवार दिनांक 19 व शनिवार दिनांक 20 जुलै, असे दोन दिवस सुट्टी जाहीर केली आहे.

गुरुवारी बेळगाव आणि परिसरात मुसळधार पाऊस गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर अधिक वाढला असून गुरुवारी दिवसभर पावसाने बेळगाव शहर आणि परिसराला झोडपून काढले आहे. धरण पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे राजा लखमगौडा (हिडकल धरण) जलाशयाच्या पाण्याची पातळी वाढली असून एकूण क्षमतेपैकी २१४५ फूट पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. मागील वर्षी याच महिन्यात २०९५ फूट पाण्याची नोंद करण्यात आली होती. यंदा १३८२९ क्युसेक पाण्याची आवक झाली असून ४२६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. मलप्रभा जलाशयात (रेणुका सागर) आजपर्यंत झालेल्या पावसामुळे एकूण क्षमतेपैकी १५.००५ टीएमसी पाणीसाठा असून ६२४७ क्युसेक पाण्याची आवक झाली आहे तर १९४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

बेळगाव शहर आणि परिसरात आज दिवसभर झालेल्या पावसामुळे अनेकठिकाणी पाणी साचले असून नागरिकांना या पाण्यातून वाट काढण्यासाठी कसरत करावी लागत आहे. सकाळपासून शहर आणि परिसरात धुव्वाधार पाऊस झाला असून यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. उद्यमबाग क्रॉसजवळ झाड कोसळून अनेक वाहनांचे नुकसान झाले. याठिकाणी पार्क करण्यात आलेल्या दुचाकींसह चार चाकीचेही नुकसान झाले. याचप्रकारे विजेचे खांब देखील कोसळण्याच्या घटना घडल्या असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.