बेळगाव :
बेळगावकरांच्या लाडक्या बेळगाव live चे संपादक प्रकाश बेळगोजी यांना महाराष्ट्र पत्रकार संघाचा राज्यस्तरीय एकलव्य पत्रकारिता पुरस्कार शनिवारी (ता. 16) चिंचवड पुणे येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी बेळगाव live ने सीमाभागात केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला.
चिंचवड येथील आहेर गार्डन येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात दिवसभर विविध कार्यक्रम झाले. दुपारी 4 वाजता राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार बहाल करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ. अमोल कोल्हे, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव, आमदार महेश लांडगे, आमदार बच्छू कडू आदींच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण करण्यात आला.
यावेळी सकाळी झालेल्या अमृतकाळातील भारत आणि पत्रकारातील राम या विषयावर परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार मंदार फणसे, महेश म्हात्रे, निरंजन टकले आणि आशिष जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. अरविंद जगताप यांनी हा परिसंवाद फुलविला. या परिसंवादात सर्वच वक्त्यांनी शहरापेक्षा लहान गावात आम्ही खेड्यात राहून पत्रकारिता करणारेच कार्य पत्रकार अपुऱ्या सुविधा आणि सुरक्षिततेचा अभाव असतानाही निर्भीडपणे पत्रकारिता लहान शहरातील पत्रकार जोपासत आले आहेत, असे गौरवद्गार काढले. त्यानंतर राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आले.
प्रकाश बेळगोजी यांना राज्यस्तरीय एकलव्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. खासदार अमोल कोल्हे, आमदार बच्चू कडू, आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बिळगोजी यांनी सीमाभागाची कैफियत मांडली. सीमाप्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांनी सरकारवर दबाव आणावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार उपस्थित राहणार होते पण आचारसंहिता आणि इतर राजकीय घडामोडीमुळे ते प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. पण या दोन्ही नेत्यांनी शुभेच्छा संदेश पाठवून पत्रकारांच्या पाठीशी थांबण्याचे आश्वासन दिले.
या अधिवेशनात पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, गोविंद वाकडे, नितीन शिंदे यांच्यासह सुमारे दीड हजार पत्रकार सहभागी झाले होते.