बेळगाव:
बिजगर्णी ग्रामपंचायत हद्दीतील परिसरात औषध फवारणीअभावी डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, विविध साथींचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तातडीने औषध फवारणी करण्याची मागणी माजी जिल्हा पंचायत सदस्य मोहन मोरे यांनी केली आहे. बिजगर्णी, कावळेवाडी, राकसकोप, व यळेबैल गाव परिसरात गेले अनेक दिवस सतत पाऊस पडत आहे. पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले असल्याचे चित्र दिसत आहे. पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने ठिकठिकाणी पाण्याची तळी तयार झाली आहेत. या पाण्यामध्ये डासांची पैदास वाढली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. पाणी साचलेल्या डबक्यांमध्ये तसेच परिसरातील मोकळ्या जागेत वाढणार्या गवतावर औषध फवारणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तालुक्यात पावसाळ्यात साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. थंडी, ताप, सर्दी, घसा दुखणे, कणकणी असे आजार असलेले रुग्ण खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. त्यामुळे साथीच्या आजारांचे रुग्णदेखील वाढत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत व संमधित अधिकार्यांनी साचलेल्या पाण्याच्या तळीवर तसेच इतर ठिकाणी त्वरित औषध फवारणी करणे गरजेचे आहे.