Spread the love

नंदीहळी ग्रामपंचायत व्याप्तीतील नागेनटी गावातील श्री यल्लमा देवी भक्त दरवर्षीप्रमाणे यंदाही सौंदत्ती येथील यल्लमा डोंगरावर गेले होते. डोंगरावर पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून ग्रामपंचायत उपाध्यक्ष, सदस्य आणि पंच कमिटीच्या सहमतीने गावातून पाण्याचा टँकर पाठविण्यात आला होता.
मात्र, मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास हा टँकर अचानक नागेनटी गावात परत आणण्यात आल्याने भक्तांमध्ये तीव्र संताप उसळला. टँकर परत का आणला, याचा जाब विचारण्यासाठी संतप्त भक्तांनी थेट बेळगाव ग्रामीण पोलीस ठाणे गाठत घेराव घातला.
या घटनेबाबत ग्रामपंचायत उपाध्यक्ष नारायण आणि भाजपा ग्रामीण मंडळाध्यक्ष धनंजय जाधव यांनी कोणीतरी राजकीय दबाव टाकून तक्रार करून भक्तांना त्रास देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.
दरम्यान, ग्रामीण पोलीस ठाण्याचे सीपीआय यांनी “कोणतीही तक्रार नोंदवलेली नाही, चुकीचे काही आढळल्यास कायदेशीर कारवाई करू,” असे स्पष्ट केले.
या सर्व प्रकारामुळे पोलीस ठाणे आणि यल्लमा डोंगर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. नंतर नागेनटी गावातील भक्त पुन्हा यल्लमा डोंगराकडे रवाना झाले.