Spread the love

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील ऐतिहासिक राजहंसगड येथील श्री सिद्धेश्वर मंदिरात मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना उपमुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी तसेच राजहंसगड व कर्नाटक राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना अधिक मोठी जबाबदारी मिळावी, या हेतूने विशेष अभिषेक व पूजेचे आयोजन करण्यात आले.
राजहंसगड पंच कमिटी व देवस्थान पंच कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक कार्यक्रमात श्री सिद्धेश्वर देवाला अभिषेक करून विकासकामांसाठी आणि जनकल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी देवाकडे साकडे घालत लक्ष्मी हेब्बाळकर यांना उपमुख्यमंत्रीपद मिळून राज्याच्या प्रगतीसाठी कार्य करण्याची संधी लाभावी, अशी भावना व्यक्त करण्यात आली.
या पूजाविधीचा अभिषेक माजी तालुका पंचायत सदस्य सिद्धाप्पा छत्रे आणि हनमंत नावगेकर यांच्या शुभहस्ते पार पडला. कार्यक्रमास देवस्थान पंच कमिटीचे सिद्धाप्पा पवार यांच्यासह पंच कमिटीचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजहंसगडच्या विकासासह संपूर्ण कर्नाटकच्या प्रगतीसाठी हा धार्मिक उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.