Spread the love

बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची दमदार प्रगती; 2025-26 मध्ये 56.25 कोटी नफा
बेळगाव : बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.ने 2025-26 या आर्थिक वर्षात सर्वच क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती साधत आर्थिक बळकटी सिद्ध केली आहे. चालू वर्षात 8 नवीन शाखांची भर पडून बँकेच्या एकूण शाखांची संख्या 112 वर पोहोचली आहे.
ग्राहकाभिमुख सेवा वाढवण्यासाठी बँकेने डिजिटलीकरणावर भर देत लवकरच IMPS व UPI सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. तसेच एटीएम सुविधा सुरू करण्यात आली असून सायबर सुरक्षेच्या दृष्टीने आरबीआय व नाबार्डच्या मार्गदर्शक तत्वांनुसार आधुनिक प्रणाली लागू केली जात आहे.
ठेव संकलनातही मोठी वाढ नोंदवण्यात आली असून चालू वर्षात 6703.36 कोटी रुपयांची ठेव जमा झाली आहे, जी मागील वर्षापेक्षा 616.30 कोटींनी अधिक आहे. कृषी क्षेत्रात 4,77,464 शेतकऱ्यांना 0% व्याजदराने 3818.79 कोटी रुपयांचे कर्ज वितरित करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे.
याशिवाय ट्रॅक्टर, पाईपलाईन व विविध कृषी साधनांसाठी कर्ज, तसेच 165 संस्थांना 22.89 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. स्वयंसहायता गटांना 36.18 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले असून 5 लाखांपर्यंत शून्य व्याजदराची सुविधा दिली जात आहे.
बिगरशेती कर्जांतर्गत 160.28 कोटी आणि सुवर्ण कर्जापोटी 173.36 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. यशस्विनी योजनेत 3,64,204 शेतकरी सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे आरोग्य सुरक्षा मजबूत झाली आहे.
विशेष म्हणजे, बँकेने चालू वर्षात तब्बल 56.25 कोटी रुपयांचा नफा कमावला असून जे.एन. इन्फ्रास्ट्रक्चर कर्जावरील 11.60 कोटी व्याज वसुलीही अपेक्षित आहे.
एकूणच, बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्वसमावेशक विकासाचा आदर्श ठेवत आर्थिक क्षेत्रात आपली भक्कम छाप निर्माण केली आहे.