Spread the love
  1. हदिगनूर परिसरात तब्बल 58 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर महालक्ष्मी यात्रेचा मंगलमय सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. म्हाळेनट्टी, बोडकेनट्टी, होसोळी, कट्टनभाबी, कुरिहाळ केएच व कुरिहाळ बीके या सात गावांच्या ग्रामदेवता व वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने हा सोहळा पार पडत असून ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
    मंगळवार दि. 14 एप्रिल 2026 पासून बुधवार दि. 22 एप्रिल 2026 पर्यंत ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे. यात्रेची सर्व तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून रथाची जोडणी पूर्ण झाली आहे. सध्या रथाची आकर्षक सजावट व रंगरंगोटी सुरू आहे. तसेच श्री महालक्ष्मी देवीच्या गदगेचे ठिकाण आणि मंडप उभारणीचे कामही वेगाने सुरू आहे.
    यात्रेच्या काळात भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन वाहन पार्किंगची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. बेळगाव रोड, चलवेनटी रोड धाबा परिसर, म्हाळेनट्टी रोड डोनेशन परिसर तसेच कुदनूर व बोडकेनट्टी रोड शेतकरी धावा परिसर येथे पार्किंगची सोय करण्यात आली आहे.
    यमकनमर्डी मतदारसंघाचे आमदार तथा मंत्री सतीश जारकीहोळी आणि खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या निधीतून सुमारे 5 कोटी रुपयांच्या खर्चातून सीसी रोडसह विविध विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत. तसेच यात्रा काळात मुख्य मार्गावरील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पर्यायी मार्गांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
    यात्रेसाठी आवश्यक मानसी वर्गणीपैकी सुमारे 90 टक्के रक्कम ग्रामस्थांकडून जमा झाली असून विविध समाज, गावकरी आणि मुंबईतील मंडळांनीही देणगीच्या माध्यमातून मोठे सहकार्य केले आहे.
    यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी 40 सदस्यांची कमिटी सातत्याने बैठक घेऊन नियोजन करत आहे. अध्यक्ष गंगाधर पाटील, उपाध्यक्ष दयानंद पाटील, कार्याध्यक्ष महेश पाटील, स्वागताध्यक्ष पुंडलिक पाटील, खजिनदार मारुती पाटील, सेक्रेटरी संभाजी पाटील यांच्यासह सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत.

    विशेष म्हणजे, महालक्ष्मी देवीच्या रथाचे मानकरी सुतार समाज असून त्यांनी आकर्षक कलाकृतींचा वापर करून भव्य रथ साकारला आहे. एकूणच, हदिगनूर परिसरातील महालक्ष्मी यात्रा 2026 हा धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचा अद्वितीय सोहळा ठरत आहे.