Spread the love

ज्येष्ठ नागरिकांसोबत मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा वाढदिवस
शनिवारी १५ हजार ज्येष्ठांच्या उपस्थितीत भव्य सोहळा
बेलगाव : महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर या यंदा आपला वाढदिवस ज्येष्ठ नागरिकांसोबत विशेष पद्धतीने साजरा करणार असून, शनिवारी दुपारी २ वाजता बेनकनहळ्ळी येथील गार्डन कोर्ट हॉटेलसमोरील मैदानात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या कार्यक्रमात बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील १५ हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिक सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
“ज्येष्ठ नागरिक हे समाजाची खरी संपत्ती असून त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्यच मला शक्ती देते,” असे लक्ष्मी हेब्बाळकर वारंवार सांगतात. त्याच भावनेतून ज्येष्ठांचा सन्मान, संवाद आणि विविध मनोरंजनात्मक उपक्रमांद्वारे हा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.
कार्यक्रमात म्युझिकल चेअर्स, गन-बलून शूटिंग, रिंग इन विकेट्स, अंडरवॉटर कॉइन चॅलेंज, लिंबू-चमचा शर्यत यांसह दहा पेक्षा अधिक खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सन्मान सोहळे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचीही मेजवानी ज्येष्ठांना अनुभवता येणार आहे.
हट्टीहोळी म्हणाले की, बेळगाव ग्रामीण मतदारसंघात लक्ष्मी हेब्बाळकर यांनी अभूतपूर्व विकासकामे केली आहेत. “नुडिदंते नडेद ताई” (दिलेल्या शब्दाप्रमाणे काम करणारी आई) म्हणून गावागावांत त्यांचा गौरव होत असून, लोक स्वतःहून फलक लावत कृतज्ञता व्यक्त करत आहेत.
लहान असो वा मोठे, वैयक्तिक असो वा सार्वजनिक — कोणतेही काम असो, लक्ष्मी हेब्बाळकर आहेतच, असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. पक्ष, जात, धर्म यापलीकडे जाऊन लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याच्या भावनेतूनच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेला काडा अध्यक्ष युवराज कदम, आडवेस इटगी, देसुरकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.