Spread the love

बेळगाव : वडगाव येथील रयत गल्ली परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने संतप्त महिला व नागरिकांनी मंगळवारी थेट घागरी डोक्यावर घेऊन बेळगाव महानगरपालिकेवर मोर्चा काढत धडक दिली. पाणीपुरवठा तात्काळ सुरू करावा, अन्यथा मनपा कार्यालयासमोरून हलणार नाही, असा ठाम इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
परिसरातील विहिरींमध्ये ड्रेनेजचे पाणी मिसळल्याने पाणी दूषित झाले असून त्यामुळे नागरिकांसह जनावरांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध नसल्याने नागरिक त्रस्त झाले असून याबाबत महानगरपालिकेला अनेक वेळा कळवूनही दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला.
या वेळी शेतकरी राजू मर्वे यांनी पाण्याअभावी नागरिकांना भेडसावत असलेल्या अडचणी आणि वेदना मनपा आयुक्तांसमोर मांडल्या. त्यानंतर आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तातडीने चौकशी करत त्वरित पाणीपुरवठा सुरू करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, बेळगाव शहरातील पाणी वितरणाचे काम सध्या एल अँड टी कंपनीकडे असून रयत गल्लीतील पाणीपुरवठाही त्यांच्याकडूनच केला जातो. मात्र पंधरा दिवसांपासून पाणी न आल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. तसेच या प्रश्नाकडे स्थानिक नगरसेवक उदय उपरी यांनीही दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला.