*येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघातर्फे वक्तृत्व स्पर्धा उत्साहात; ४० विद्यार्थ्यांचा सहभाग*
*दिवंगत वाय. बी. चौगुले यांच्या स्मरणार्थ वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन*


बेळगाव –
बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाने सीमा भागातील मराठी भाषेचे संवर्धन, तिचा विकास तसेच विद्यार्थ्यांच्या बौद्धिक प्रगतीला चालना देण्याच्या उद्देशाने आज सोमवार, दि. १९ जानेवारी २०२६ रोजी दिवंगत वाय. बी. चौगुले यांच्या स्मरणार्थ वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. गिरीश कॉम्प्लेक्समधील भगतसिंग सभागृह येथे पार पडलेल्या या स्पर्धेत प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या वक्तृत्व स्पर्धेत बेळगाव व परिसरातील एकूण ४० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष नागेश बोभाटे होते, तर स्नेहलता वाय. चौगुले या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, हलकर्णी येथील प्रा. डॉ. सरिता मोटराचे (गुरव), कॅन्टोन्मेंट शाळा बेळगावचे शिक्षक महेश कुंभार, साक्षी कणबर्गी आणि अनुजा पाटील यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंत मोटराचे यांनी केले, सूत्रसंचालन अमोल जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुरज पाटील यांनी केले.
यावेळी राम पाखरे, योगेश सुळगेकर, मंथन कुगजी, ऋषिकेश मजुकर यांच्यासह साहित्य संघाचे इतर सदस्य उपस्थित होते.
स्पर्धेच्या निकालानुसार, प्राथमिक विभागात प्रथम क्रमांक दूर्वा हेब्बाळकर (मराठी शाळा हिंडलगा-सुळगा), द्वितीय सर्वज्ञा मोदगेकर (मराठी विद्यानिकेतन), तृतीय समिधा मेलगे (मराठी विद्यानिकेतन) तर उत्तेजनार्थ तनुजा काजोळकर (मराठी विद्यानिकेतन) यांनी मिळविला.
उच्च प्राथमिक विभागात प्रथम भूमी भातकांडे (बालिका आदर्श विद्यालय), द्वितीय सृजन पाटील (मराठी विद्यानिकेतन), तृतीय पूर्वी घाडी (सरकारी मराठी मॉडेल शाळा, येळ्ळूर) आणि उत्तेजनार्थ सार्थक पाटील यांना पारितोषिके मिळाली.
माध्यमिक विभागात प्रथम हर्षदा भातकांडे (एस.डी.ए. शाळा, वडगाव), द्वितीय साईराज गुरव (मराठी विद्यानिकेतन), तृतीय वैष्णवी कुंडेकर (महाराष्ट्र हायस्कूल, येळ्ळूर) तर उत्तेजनार्थ मनाली बोराटे (मराठी विद्यानिकेतन) यांनी यश संपादन केले.
सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव एक फेब्रुवारी रोजी संपन्न होणाऱ्या येळ्ळूर साहित्य संमेलनात करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
