बेळगाव एपीएमसी मार्केटमध्ये अडत (कमिशन) व्यापाऱ्यांना फसवण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी दुपारी लक्ष्मीनारायण ट्रेडर्सचे मालक राजू पाटील यांच्या दुकानात घडलेल्या घटनेमुळे ही बाब पुन्हा एकदा समोर आली आहे.
नेहमीप्रमाणे आग्रा येथून बटाट्यांचा माल घेऊन आलेल्या एका ट्रक चालकाने आपल्या सोबत आणखी तीन ड्रायव्हर घेऊन दुकानात प्रवेश केला. त्यानंतर ट्रक चालकाने आपल्या सोबत आलेल्या एका व्यक्तीकडे मालाची पोचपावती दिली. त्या व्यक्तीने या पावतीच्या आधारे राजू पाटील यांच्या कारकुनाकडून तब्बल १ लाख १८ हजार रुपये घेऊन दुकानातून निघून गेला.
काही तासांनंतर नेहमी पैसे घेऊन जाणारा मूळ ट्रक चालक पुन्हा दुकानात आला व आपली रक्कम मागू लागला. मात्र, आधीच त्याच्यासोबत आलेल्या व्यक्तीस पैसे दिल्याचे सांगताच मोठा गोंधळ निर्माण झाला. यानंतर संबंधित ट्रक चालकाने थेट बेळगाव एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ राजू पाटील यांना फोन करून पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले. मात्र दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण प्रकार कैद झाल्याने सत्य परिस्थिती समोर आली आणि राजू पाटील यांची निर्दोष सुटका झाली. यामुळे एका मोठ्या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.
या घटनेनंतर एपीएमसी मार्केटमधील अडत व्यापाऱ्यांनी विशेष सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त केली आहे. अनोळखी व्यक्तींना केवळ पोचपावतीच्या आधारे रक्कम देणे धोकादायक ठरू शकते. अशा फसवणूक प्रकारांपासून वाचण्यासाठी ओळख पटवून घेणे, अधिकृत ड्रायव्हरची खातरजमा करणे व सीसीटीव्ही व्यवस्था सक्षम ठेवणे आवश्यक असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
