Spread the love

उडुपी : मंदिरांचा जीर्णोद्धार केल्यास संपूर्ण मानवजातीचा विकास होतो, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री तसेच उडुपी जिल्ह्याच्या प्रभारी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले. बायंदूर तालुक्यातील हेरंजाळू येथील श्री गुडे महालिंगेश्वर मंदिराच्या नव्या राजगोपुराच्या समर्पण व अतिरुद्र महायागाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
मंदिर हे श्रद्धेचे केंद्र असून त्यांचा विकास केल्यास समाजात शांतता आणि सकारात्मकता वाढते. माणसाला खऱ्या अर्थाने समाधान देणारी दोन ठिकाणे म्हणजे आईची माया आणि मंदिर, जिथे माणूस आपल्या सर्व अडचणी देवासमोर मोकळेपणाने मांडतो, असे त्यांनी सांगितले.
गुरु, आई-वडील आणि देव यांचे आशीर्वाद यशामागील मुख्य शक्ती असल्याचे नमूद करत, भूतकाळ विसरून चालणार नाही, तर त्यातून प्रेरणा घेत पुढे जावे, असे त्यांनी सांगितले. मंदिरासाठी राजगोपुर उभारणारे जयशील शेट्टी यांचेही त्यांनी कौतुक केले.
उडुपी जिल्हा हा ‘देवांची भूमी’ असून येथे अनेक भक्त दर्शनासाठी येतात. येथील मंदिरे अन्नप्रसादाच्या माध्यमातून गरिबांची भूक भागवत आहेत. तसेच या भागातील लोक पक्षभेद विसरून धार्मिक कार्यात एकत्र येतात, ही बाब कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
शाळा, रस्ते, रुग्णालये यांचा विकास हा स्थानिक पातळीवर मर्यादित असतो, परंतु मंदिरांचा विकास संपूर्ण मानवजातीच्या उन्नतीसाठी कारणीभूत ठरतो. स्वतःच्या मतदारसंघात 154 मंदिरांचा जीर्णोद्धार केल्याचे त्यांनी सांगितले. देशाची संस्कृती, विविधता आणि श्रद्धा हीच आपली खरी ताकद असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या कार्यक्रमास डॉ. मल्लिकार्जुन महास्वामी, आमदार बालचंद्र जारकिहोळी, माजी मंत्री जयप्रकाश हेगडे, माजी आमदार गोपाळ पुजारी, जयशील शेट्टी, पद्मनाभ, जिल्हाधिकारी स्वरूप टी.के., जि.प. सीईओ प्रतीक बायल, पोलीस अधीक्षक हरिराम शंकर तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.