Spread the love

*येळ्ळूर मधील विविध संघटनेच्यावतीने पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांचा सत्कार*

*बेळगांव दि.* – साहित्य व शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे, येळ्ळूर गावाशी सलोख्याचे, सहकार्याचे नाते जपणारे, दूरदृष्टीने के एल इ संस्थेचा नावलौकिक वाढविणारे, जनमानसामध्ये आदराचे स्थान निर्माण केलेले आदरणीय डॉ. प्रभाकर कोरे यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारापैकी “पद्मश्री” पुरस्कार जाहीर झाल्यामुळे येळ्ळूर गावातील विविध संघटनांनी त्यांचा सत्कार केला.
येळ्ळूर गावातील विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. डॉ.प्रभाकर कोरे यांनी येळ्ळूर जवळ सुसज्ज असे केएलई चॅरिटेबल हॉस्पिटल उभे करून बेळगाव, खानापूर परिसरातील असंख्य लोकांना वैद्यकीय सोयीची उपलब्धता केली, त्यामुळे गरीब लोकांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर अनेकांना वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या देऊन येळ्ळूर व परिसरातील लोकांना रोजगाराची व्यवस्था केली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्तम प्रतीचे शिक्षण देण्यासाठी, तसेच केएलई संस्थेच्या माध्यमातून वैद्यकीय, तांत्रिक, अभियांत्रिकी संस्था उभारून जगाच्या नकाशामध्ये बेळगावचे नाव त्यांनी कोरलेले आहे. त्यांच्या या समाजकल्याण, मानवतावादी देश कार्याची नोंद घेऊन मानाचा, प्रतिष्ठेचा “पद्मश्री” पुरस्कार दिला आहे. याचा आम्हा येळ्ळूर वासियांना रास्त अभिमान आहे असे उदगार महाराष्ट्र हायस्कूल येळ्ळूर चे मुख्याध्यापक श्री बबन कानशिडे यांनी सत्कार प्रसंगी काढले.
येळ्ळूर गावचे सेवानिवृत्त क्रीडाधिकारी, येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष विलास घाडी, माजी तालुका पंचायत सदस्य रावजी पाटील, माजी ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील, नवहिंद चे अध्यक्ष नारायण गोरे, सन्मित्र सोसायटीचे चेअरमन राजकुमार पाटील, सैनिक सोसायटीचे चेअरमन परशराम घाडी, येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी अध्यक्ष शांताराम कुगजी यांनी डॉ. प्रभाकर कोरे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या प्रसंगी समितीचे कार्याध्यक्ष भुजंग पाटील, ग्राम पंचायत सदस्य रमेश मेणसे, परशराम परिट,नवहिंद क्रीडा केंद्राचे संचालक सी बी पाटील, सेक्रेटरी आनंद पाटील, वाय सी गोरल, नारायण बस्तवाडकर, गोपाळ शहापूरकर, दशरथ पाटील, वाय एन पाटील, बबन कुगजी, उद्योजक एन डी पाटील, मुख्याध्यापक राजेंद्र चलवादी, मलाप्पा काकतीकर, लक्ष्मण मेलगे, निखिल पाटील, राघवेंद्र सुतार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.