येळ्ळूर नामफलक प्रकरणात आणखी एका गुन्ह्यातून ४२ जणांची निर्दोष मुक्तता; मराठी सीमालढ्याला बळ

बातमी :
बेळगाव : मराठी भाषिक भागातील येळ्ळूर गावातील ‘महाराष्ट्र राज्य’ फलक हटवल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या खटल्यांपैकी खटला क्रमांक १२५ मध्ये सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. या निकालाकडे सीमाभागातील मराठी समाजाचे लक्ष लागले होते. सर्व ४२ आरोपींना निर्दोष ठरवल्याने सीमालढ्याला नवसंजीवनी मिळाली आहे.
‘महाराष्ट्र राज्य’ फलक हटवल्यानंतर ग्रामस्थांवर पोलिसांनी मारहाण करून तब्बल सात गुन्हे दाखल केले होते. यापैकी तीन खटल्यांचा निकाल यापूर्वी लागला असून सर्व आरोपी निर्दोष ठरले आहेत. आज जाहीर झालेल्या निकालात पोलिसांनी दाखल केलेल्या प्रकरणातील ४२ जणांवर आरोप होते. त्यापैकी सात जणांना वगळण्यात आले, तर तिघांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण ३२ आरोपींवर हा खटला सुरू होता.
या सर्व ३२ आरोपींनी मागील सुनावणीत न्यायालयात हजेरी लावून आपले जबाब नोंदवले होते. निकालात अर्जुन नागप्पा गोरल, चांगदेव देसाई, अनंत चिट्टी, वृषेशण पाटील, सामाजी हत्तीकर, शिवाजी कदम, सुनील धामणेकर, परशराम कुंडेकर, महेश कानशिदे, विशाल गोरल यांच्यासह सर्वांना निर्दोष घोषित करण्यात आले आहे.
एकूण सात खटल्यांपैकी चौथ्या खटल्यात देखील येळ्ळूरवासीयांची निर्दोष मुक्तता झाल्याने सीमाभागातील मराठी भाषिकांच्या संघर्षाला अधिक बळ मिळाले आहे. उर्वरित तीन खटले प्रलंबित असून तेही लढ्यातील सहकार्याने यशस्वीपणे हाताळले जातील, असा विश्वास ॲड. श्यामसुंदर पत्तार यांनी व्यक्त केला.
—
