जेसीईआरच्या ‘सविष्कार’ राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक-सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन

देशाच्या विकासासाठी नवनवीन संशोधन अत्यावश्यक : डीसीपी नारायण भरमणी
बेळगाव : “देशाच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन संशोधन अत्यावश्यक आहे. विद्यार्थी संशोधनाच्या दिशेने वाटचाल करतील, तेव्हाच नव्या रोजगारनिर्मितीच्या संधी उपलब्ध होतील आणि भारत अधिक बलशाली बनेल,” असे मत बेळगावचे कायदा व सुव्यवस्था उपायुक्त नारायण व्ही. भरमणी यांनी व्यक्त केले.
जैन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (JCE&R) यांच्या वतीने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक-सांस्कृतिक महोत्सव “सविष्कार” चा शुभारंभ ए.पी.जे. अब्दुल कलाम सभागृहात झाला.
या प्रसंगी बोलताना भरमणी म्हणाले, “संशोधन क्षेत्रात भारताने जागतिक स्तरावर आपली छाप निर्माण करावी. कृत्रिम बुद्धिमत्ता, जैवतंत्रज्ञान, ऊर्जा सुरक्षा, अवकाश तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांत नवे संशोधन देशाच्या प्रगतीस बळकटी देईल. विद्यार्थी आपल्या अभ्यासक्रमातून संशोधनशील दृष्टिकोन वाढवावा.”
कॉलेजचे प्राचार्य व संचालक डॉ. एस.एच. गोरबाळ म्हणाले, “स्पर्धात्मक आणि वैज्ञानिक युगात भारताच्या प्रगतीसाठी संशोधनच मुख्य मार्ग आहे. विद्यार्थी देशविकासाला ध्येय मानून नवे प्रयोग व प्रकल्प राबवावेत.”
या कार्यक्रमात जैन ग्रुपचे संचालक आर. धारवाडकर, डॉ. प्रकाश सोनवळकर, कार्तिक रामदुर्ग, राघवेंद्र कटगल्ल, राहुल बण्णूर, साक्षी हत्ती, संभव कोचरी, कर्मचारीवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
