Spread the love

जीएसएस पीयू कॉलेजतर्फे विद्यार्थी वर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी एक विशेष शैक्षणिक अभ्यास यात्रा आयोजित करण्यात आली. पीयूसी प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आंगडी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट येथील अत्याधुनिक रोबोटिक्स विभागाला प्रत्यक्ष भेट देऊन आधुनिक तंत्रज्ञानाची सखोल माहिती मिळवली.

विद्यार्थ्यांना यंत्रमानव निर्मिती, त्यासाठी लागणारे तांत्रिक घटक, तसेच विविध प्रयोगशाळांतील प्रत्यक्ष कार्यप्रणाली जाणून घेण्याची संधी मिळाली. रोबोटिक्स विभाग प्रमुख डाॅ. पूजा अनगोळकर यांनी विद्यार्थ्यांना रोबोटिक्स क्षेत्रातील नवीन संशोधन, घटकांची कार्यपद्धती आणि प्रत्यक्ष तांत्रिक प्रक्रियांबाबत माहिती दिली.

तसेच प्रा. सागर बिर्जे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना ड्रोनची रचना, वापरलेले तंत्रज्ञान आणि AI विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या रिसायकलिंग मशीनची प्रात्यक्षिके दाखवून मार्गदर्शन केले.

जीएसएस पीयू कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाशी संबंधित विविध प्रयोगशाळांना भेट देऊन प्रत्यक्ष अनुभवातून व्यापक ज्ञान आत्मसात केले.

या शैक्षणिक यात्रेचे आयोजन संगणक विभाग प्रमुख प्रा. सोनिया चिठ्ठी आणि प्रा. दत्तात्रय जोशी यांनी प्राचार्य एस. एन. देशाई यांच्या मार्गदर्शनाखाली केले. या अभ्यास यात्रेमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी करिअरसाठी योग्य दिशा निवडण्यास निश्चितच मोठी मदत मिळणार आहे.