केआयडीबी हॉलमधील ४८ शौचालय ब्लॉक्सचे 2018 मधील बांधकाम; कंत्राटदाराची ९.६३ लाखांची थकबाकी अद्याप अपूर्ण
बेळगाव – 2018 साली झालेल्या अधिवेशनादरम्यान केआयडीबी हॉल येथे 48 शौचालय ब्लॉक्सचे बांधकाम करण्यात आले होते. बेळगावी पोलिस आयुक्त कार्यालयाकडून आदेश मिळाल्याने कंत्राटदाराने हे काम वेळेत पूर्ण करून बिल सादर केले होते. एकूण 14,63,403 रुपयांच्या खर्चापैकी 5 लाख रुपये एवढीच रक्कम कंत्राटदाराला अदा करण्यात आली असून 9,63,403 रुपये इतकी मोठी थकबाकी अद्याप अपूर्ण आहे.
कंत्राटदाराने सांगितले की, 2018 पासून अनेक वेळा थकबाकी मागणी करूनही पोलीस आयुक्त कार्यालय विविध कारणांनी देयक देण्यास विलंब करत आहे. 2019 मध्ये दिलेल्या विनंतीपत्राची प्रत अनुसरूनही काहीही कार्यवाही झालेली नाही.
कोविड-19 महामारीनंतर आर्थिक परिस्थिती गंभीर झाल्याचे कंत्राटदाराने नमूद केले आहे. शौचालय बांधकामासाठी साहित्य उधारीवर घेतल्याने आणि कामगारांचे वेतन भरल्याने मोठे कर्ज झाले असून पुरवठादारांकडून दररोज पैसे मागण्याचा तगादा सुरू असल्याने मानसिक ताण वाढला आहे.
कंत्राटदाराने उपआयुक्तांकडे तातडीने हस्तक्षेप करून बेळगावी पोलिस आयुक्त कार्यालयाला थकबाकी रक्कम तत्काळ अदा करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे.
