Spread the love

बेळगावातील ग्राहक वाद निवारण आयोग खंडपीठ ठप्प; अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्तीसाठी वकील संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे धडक

प्रभावी बातमी:
बेळगाव येथे स्थापन केलेले कर्नाटक राज्य ग्राहक वाद निवारण आयोगाचे खंडपीठ सध्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या अनुपस्थितीमुळे प्रभावीपणे कार्यरत नसल्याने प्रलंबित प्रकरणांचा ढीग वाढत चालला आहे. परिणामी पक्षकारांना वेळेवर न्याय मिळत नसल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

या तातडीच्या प्रश्नावर बेळगाव बार असोसिएशनच्या वकिलांनी आज अध्यक्ष ॲड. बसवराज एम. मुगळी आणि सरचिटणीस ॲड. वाय. के. दिवटे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांना उद्देशून निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी हे निवेदन तत्काळ मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.

बेळगावातील ग्राहक वाद निवारण आयोगाचे खंडपीठ स्थापन करण्यामागील उद्दिष्ट जलद, सुलभ आणि स्थानिक पातळीवर न्याय उपलब्ध करून देणे हे होते. मात्र पीठासीन पदाधिकारी नियुक्त नसल्याने आयोग अकार्यक्षम ठरत असून न्यायप्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

वेळेत नियुक्ती न झाल्यास अनिश्चित काळासाठी आंदोलन सुरू करण्याचा इशाराही वकील संघटनेने दिला आहे. संघटनेची स्पष्ट मागणी आहे की खंडपीठाचे अध्यक्ष आणि सदस्यांची तात्काळ पूर्णवेळ नियुक्ती करून आयोगाचे नियमित कामकाज सुरू करण्यात यावे.