Spread the love

बेळगावातील रद्द विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्राकडे निवेदन; व्यापारी वर्ग आक्रम
बेळगाव :
बेळगाव येथील विमानतळावरील विमानसेवांमध्ये सातत्याने कपात होत असून अनेक महत्त्वाच्या सेवा बंद करण्यात आल्याने व्यापारी, उद्योजक तसेच प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीचा थेट फटका शहरातील व्यापार, उद्योग आणि व्यावसायिक प्रवासावर बसत असून बेळगावच्या आर्थिक प्रगतीला खीळ बसत असल्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (BCCI) आणि अन्य औद्योगिक संघटनांनी केंद्र सरकारकडे निवेदन सादर करून रद्द झालेल्या विमानसेवा तातडीने पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे.
शुक्रवारी चेंबर ऑफ कॉमर्स कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना BCCI चे अध्यक्ष प्रभाकर नगरमुनोळी म्हणाले की, अचानक विमानसेवा बंद झाल्यामुळे शहरातील व्यापारी वर्गाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. “या समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिले गेले नाही, तर चेंबरच्या वतीने लवकरच तीव्र आंदोलन छेडावे लागेल,” असा इशाराही त्यांनी दिला.
नगरमुनोळी यांनी सांगितले की, UDAN-3 योजनेअंतर्गत सुरू झालेल्या विमानसेवांमुळे बेळगावचा हवाई संपर्क मोठ्या प्रमाणात सुधारला होता. हुबळी, गोवा यांसारख्या शेजारील शहरांमधून प्रवासी बेळगावकडे येऊ लागले होते. मात्र या सेवा अचानक बंद झाल्याने प्रत्येक व्यापारी, उद्योगपती आणि व्यापार परवाना धारक अडचणीत सापडला आहे.
ही गंभीर बाब बेळगावचे खासदार यांच्या निदर्शनास आणून दिली जाणार असून, १८ जानेवारी रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री यांची भेट घेऊन बेळगावसाठी विमानसेवा तातडीने पुनर्स्थापित करण्याची ठोस मागणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला उद्योगपती राम बंडारी, सचिन सबनीस, सतीश कुलकर्णी, अभय पै यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
बेळगावच्या विकासासाठी हवाई संपर्क अत्यावश्यक असून, केंद्र सरकारने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.