संकुकाई कपमध्ये ए.व्ही. कराटे ॲकॅडमीच्या खेळाडूंचे घवघवीत यश
बेळगाव / प्रतिनिधी
गोव्यातील फोंडा येथे दि. ४ जानेवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या संकुकाई कप कराटे स्पर्धेत बेळगावच्या ए.व्ही. कराटे ॲकॅडमीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. प्रशिक्षक अमित वेसणे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी काता व कुमिते प्रकारात अनेक पदकांची कमाई केली.
या स्पर्धेत अनन्या एन. मिठारे, श्रीनिवास आर. कुलकर्णी आणि साची व्ही.अथणीमठ यांनी काता प्रकारात तिसरे स्थान पटकावले. नीरजा व्ही. बडगी हिने काता प्रकारात दुसरे स्थान मिळवून ॲकॅडमीचे नाव उज्वल केले.
स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये शौर्य एस. गोडसे याने काता प्रकारात पहिले तर कुमितेमध्ये दुसरे स्थान पटकावले. सृष्टी एस. जाधव हिने काता आणि कुमिते या दोन्ही प्रकारांत पहिले स्थान मिळवून दुहेरी सुवर्णपदकाची कमाई केली. तसेच ईशान ए. करगुप्पिकर यानेही काता व कुमिते या दोन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक पटकावत शानदार यश मिळवले.
ए.व्ही.कराटे ॲकॅडमीच्या या यशाबद्दल खेळाडू, प्रशिक्षक अमित वेसणे तसेच पालकांचे सर्वत्र अभिनंदन होत असून, भविष्यातही खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
