Spread the love

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने मराठी अस्मिता आणि संविधानिक हक्कांच्या मागणीसाठी काढण्यात येणाऱ्या मराठी सन्मान यात्रेची सुरुवात स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथून होणार आहे. प्रजासत्ताक दिनी, 26 जानेवारी 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन ही यात्रा प्रारंभ होणार आहे.
मराठा मंदिर, बेळगाव येथे दिनांक 12 जानेवारी रोजी झालेल्या महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या सुरुवातीला 17 जानेवारी रोजी होणाऱ्या हुतात्मा दिनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी 26 जानेवारी हा भारताचा लोकशाही दिवस असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाची कर्नाटक सरकारकडून सीमाभागात गेली 70 वर्षे पायमल्ली होत असल्याचा आरोप करण्यात आला. मराठी भाषिकांच्या न्याय्य हक्कांसाठी ही मराठी सन्मान यात्रा काढण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत यात्रेच्या नियोजनावर सविस्तर चर्चा झाली. यात्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी 20 जानेवारी 2026 पर्यंत नावे नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे व उपाध्यक्ष नारायण मुचंडिकर यांचे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले.