२९ व्या वर्षात प्रवेशलेली श्री स्वामी समर्थ पालखी–पादुका परिक्रमा १९ ते २६ जानेवारीदरम्यान बेळगावात

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट न्यास यांच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारी श्री स्वामी समर्थांची पालखी व पादुकांची पवित्र परिक्रमा यंदा २९ व्या वर्षात पदार्पण करत आहे. भक्ती, श्रद्धा आणि सेवाभावाचे प्रतीक असलेली ही परिक्रमा महाराष्ट्रभर भ्रमण करत बेळगाव शहरात १९ ते २६ जानेवारीदरम्यान विविध ठिकाणी मुक्कामी राहणार आहे.
अक्कलकोट येथे प्रत्यक्ष जाऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेणे अनेक स्वामीभक्तांना—विशेषतः अबालवृद्ध व महिलांना—शक्य होत नाही. अशा भक्तांना दर्शनाचा लाभ मिळावा व त्यांच्या सेवेला स्वीकारावे, या भावनेतूनच श्री स्वामी समर्थ स्वतः भक्तांच्या गावी येतात, अशी दृढ श्रद्धा भक्तांमध्ये आहे.
अक्कलकोट येथून १६ नोव्हेंबर रोजी या पवित्र परिक्रमेचे प्रस्थान झाले असून, महाराष्ट्रातील विविध शहरे व गावांतून प्रवास करत ही परिक्रमा २० जानेवारी रोजी बेळगावात दाखल होणार आहे. २५ जानेवारीपर्यंत बेळगाव शहरातील विविध भागांत पालखी व पादुकांचा मुक्काम राहणार आहे.
या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर व परिसरातील सर्व स्वामीभक्तांनी श्री स्वामी समर्थांच्या पालखी व पादुकांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोटचे उपाध्यक्ष अभय खोबरे यांनी केले आहे.
