संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने 17 जानेवारी 1956 रोजी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना बेळगाव शहरात भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. याच अनुषंगाने शिवसेनेच्या वतीने कग्राळी येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.
बेळगाव शहरातील हुतात्मा चौकात मराठी भाषिकांनी एकत्र येत हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. यावेळी समितीचे नगरसेवक, महिला व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामदेव गल्ली, खडे बाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, असुरकर गल्ली ते किर्लोस्कर रोड परिसरात फेरी काढत “बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे”, “बेळगाव–कारवारसह संयुक्त महाराष्ट्र” अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.
भाषावार प्रांत रचनेनंतर झालेल्या आंदोलनात बेळगावातील मराठी हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करत, सीमा भाग महाराष्ट्रात विलीन झाल्यावरच हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली मिळेल, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

