Spread the love

धारवाड | झकिया मुल्ला हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, प्रियकरच निघाला मारेकरी
धारवाड : नोकरीच्या शोधात घरातून बाहेर पडलेल्या १९ वर्षीय झकिया मुल्ला हिचा मृतदेह धारवाड शहराच्या बाहेर मनसूर रोडवरील डेअरी परिसरात आढळून आल्याने खळबळ उडाली होती. आता या प्रकरणात धक्कादायक वळण समोर आले असून, झकियाचा प्रियकर साबीर मुल्लाच हत्येचा आरोपी असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
झकिया व साबीर हे परस्पर प्रेमात होते. दोन्ही कुटुंबांनी त्यांच्या लग्नालाही संमती दिली होती आणि पुढील महिन्यात साखरपुडा करण्याचे ठरले होते. मात्र, २० जानेवारी रोजी संध्याकाळी दोघे बाहेर फिरायला गेले असताना लग्नाच्या विषयावरून त्यांच्यात वाद झाला. हा वाद तीव्र झाल्यानंतर साबीरने झकियाची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणातील आणखी धक्कादायक बाब म्हणजे, घटनेनंतर साबीर मुल्लाने स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षकांना फोन करून घटनेची माहिती दिली होती. पोलिस घटनास्थळी पोहोचले असता तो तेथेच उपस्थित होता आणि अनभिज्ञ असल्याचे भासवत होता. मात्र, त्याच्या संशयास्पद वर्तनामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता खरा प्रकार उघडकीस आला.
सध्या धारवाड ग्रामीण पोलीस ठाण्यात साबीर मुल्लाला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आहे