Spread the love

राजहंसगड–सिद्धेश्वर परिसरातील पाणीप्रश्न सुटण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल; मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या निधीतून बोरवेलला मुहूर्त

 

राजहंसगड व सिद्धेश्वर मंदिर परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. राजहंसगड किल्ल्यावर येणारे पर्यटक तसेच सिद्धेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पाण्याची तीव्र टंचाई भासत होती. ही गंभीर बाब लक्षात येताच ग्रामीण भागातील महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी तत्काळ दखल घेत आपल्या निधीतून बोरवेलची व्यवस्था करून दिली.
या बोरवेलच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राजहंसगडचे माजी तालुका पंचायत सदस्य सिद्धाप्पा छत्रे यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. सुरुवातीपासून प्रशासन, ग्रामस्थ व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधत हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच हे महत्त्वाचे काम प्रत्यक्षात उतरल्याची भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.
सिद्धेश्वर गाव पंच कमिटीचे अध्यक्ष शाम थोरवत, गणपत जाधव तसेच माजी तालुका पंचायत सदस्य सिद्धाप्पा छत्रे यांच्या हस्ते बोरवेलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी परशराम निलचकर यांच्या हस्ते विधिवत पूजाअर्चा करून श्रीफळ फोडत बोरवेल खुदाईस प्रारंभ झाला. विशेष म्हणजे, अवघ्या एक तासाभरातच या बोरवेलला तीन इंचांपेक्षा अधिक पाणी लागल्याने उपस्थित ग्रामस्थ व भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
गावकऱ्यांनी हे पाणी सिद्धेश्वराच्या आशीर्वादाचे फळ असल्याची भावना व्यक्त करत समाधान व्यक्त केले. येत्या काळात राजहंसगड किल्ल्यापर्यंत पाईपलाईन टाकून कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्याचा संकल्प मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केला असून, त्या दिशेने नियोजन सुरू आहे.
दरम्यान, राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराज गार्डन लॉन पाण्याअभावी सुकत असल्याची बाब लक्षात घेऊन तातडीने किल्ल्यावर बोरवेलचे पाणी पोहोचवण्याचे कामही हाती घेण्यात येणार आहे.
या विकासकामांमुळे ग्रामस्थांमध्ये मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या संवेदनशील व लोकाभिमुख कार्याबद्दल कौतुक व्यक्त होत असून, माजी तालुका पंचायत सदस्य सिद्धाप्पा छत्रे यांच्या मेहनतीबद्दलही समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
बोरवेल खुदाईप्रसंगी बसवंत पवार, गुरुदास लोखंडे, शिपया भुर्लकट्टी, सुरेश थोरवत, रामा इंगळे, विजय मोरे यांच्यासह गावातील अनेक प्रमुख नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.