Spread the love

कित्तूर : भरधाव आणि निष्काळजीपणे चालविलेल्या दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या एम. के. हुबळी येथील 59 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
मृत व्यक्तीचे नाव विठ्ठल महादेवप्पा ममदापूर (वय 59, रा. एम. के. हुबळी) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 मे रोजी रात्री सुमारे 9.30 वाजता विठ्ठल ममदापूर हे एम. के. हुबळी-परिश्वाड रस्त्यावरील कुवेंपू शाळेजवळ रस्त्याच्या कडेला उभे होते. त्यावेळी परिश्वाड क्रॉसकडून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 च्या दिशेने जात असलेली केए-22 एचयू-7270 क्रमांकाची दुचाकी भरधाव वेगाने येऊन त्यांना जोरदार धडक देऊन गेली.
या भीषण अपघातात विठ्ठल ममदापूर यांच्या डोक्याला, छातीला, कपाळाला आणि डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी एम. के. हुबळी आणि नंतर बेळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना हुबळी येथील किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच 2 जून रोजी पहाटे 12.17 वाजता त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी मृताचे पुत्र राहुल विठ्ठल ममदापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कित्तूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 154/2026 अंतर्गत बीएनएस कलम 281, 125(2) आणि 106(1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे एम. के. हुबळी परिसरात हळहळ व्यक्त होत असून ममदापूर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.