बेळगावच्या लेकीचा कर्नाटक पोलीस सेवेत अभिमानास्पद ठसा!
डेली व्ह्यू विशेष : जिद्द, कठोर परिश्रम आणि ध्येयाप्रती निष्ठा असेल तर कोणतेही स्वप्न साकार करता येते, हे बेळगावच्या डॉ. श्रुती श्रीकांत पाटील यांनी सिद्ध करून दाखवले आहे. वैद्यकीय शिक्षण पूर्ण करूनही ‘अधिकारी’ बनण्याचे स्वप्न जपणाऱ्या श्रुती यांनी कर्नाटक पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर राज्यात नववा क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
मूळच्या बेळगाव तालुक्यातील उत्तर भागातील जाफरवाडी येथील आणि सध्या कंग्राळी मार्कंडेय नगर येथे राहणाऱ्या ३२ वर्षीय श्रुती सध्या पतीसोबत मुंबईतील वरळी येथे वास्तव्यास आहेत. मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या श्रुती यांनी कन्नड भाषेत परीक्षा देत हे यश मिळवले आहे, ज्यामुळे मराठी भाषिकांसाठी त्यांचा प्रवास प्रेरणादायी ठरतो.
महिला विद्यालय मराठी हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी ज्योती पदवीपूर्व महाविद्यालयात शिक्षण घेतले. पुढे भरतेश होमिओपॅथिक महाविद्यालयातून बीएचएमएस पदवी प्राप्त केली. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असतानाच स्पर्धात्मक परीक्षांची आवड जागी झाली. तत्कालीन जिल्हाधिकारी शालिनी रजनीश यांचा आदर्श, तसेच कुटुंबीयांचा मजबूत पाठिंबा हे त्यांना प्रेरणा देणारे ठरले.
वडिलांचा लाकडावरील कोरीव कामाचा व्यवसाय, आई सुरेखा यांची त्यांना साथ, तसेच मार्कंडेय नगरमधील एकत्र कुटुंबीयांचे मार्गदर्शन या सगळ्यांनी श्रुती यांचा प्रवास सुकर केला. पतीदेखील वैद्यकीय क्षेत्रात एमडी असून त्यांनीही श्रुती यांच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा दिला.
२०२० मध्ये पीएसआय परीक्षेसाठी अर्ज करून धारवाड येथे परीक्षा दिल्यानंतर २०२१ साली शारीरिक चाचणी, २०२४ मध्ये लेखी परीक्षा अशा सर्व टप्प्यांतून यशस्वी होत १० सप्टेंबर २०२५ रोजी जाहीर झालेल्या अंतिम निकालात त्यांनी राज्यात ९ वा क्रमांक पटकावला. श्रुतींचे हे यश बेळगावच्या मातीला अभिमानास्पद ठरवणारे आहे.
