Spread the love

जीवनविद्या मिशनच्या वतीने भव्य विश्वप्रार्थना रॅली संपन्न

‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ असा महान संदेश देणारे थोर समाज सुधारक सदगुरु श्री वामनराव पै यांच्या जीवनविद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र बेळगाव यांच्यावतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शहरांमध्ये विश्वप्रार्थना रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या रॅलीची सुरुवात धर्मवीर संभाजी चौक येथून होऊन किर्लोस्कर रोड,समादेवी मंदिर,खडे बाजार, काकतीवेस, चन्नमा सर्कल,चव्हाट गल्ली, भडकल गल्ली,गणपती गल्ली व मारुती मंदिर मारुती गल्ली या ठिकाणी तिची सांगता झाली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महापौर मंगेश पवार, आप्पासाहेब गुरव,अनंत लाड,डॉक्टर माधव प्रभू बाळासाहेब काकतकर,नगरसेवक श्रेयश नाकाडी, C A संदीप खन्नूकर,वैभव वेर्णेकर,माणिक अणवेकर,सुभाष देसाई साईनेकर, सुभाष देशपांडे, कृष्णकांत भट, ए. सी. पी. खडेबाजार शेकरप्पा, सी. पी. आय. महांतेश देमंनावर, सी. पी.आय कालीमिर्ची, पी.यस.आय. आनंद, पी.यस. आय. रुक्मिणी,जीवनविद्या मिशनचे ज्येष्ठ प्रबोधक शंकर बांधकर ज्येष्ठ सल्लागार श्री प्रभाकर देसाई,अध्यक्ष शैलेश शिरोडकर त्याचबरोबर जीवनविद्या मिशनचे आजी-माजी पदाधिकारी व जवळपास एक हजार नामधारक उपस्थित होते.
धर्मवीर संभाजी चौकामध्ये विश्वप्रार्थनेचा जयघोष करून रॅलीला सुरुवात करण्यात आली. जीवनविद्या मिशन ही संस्था समाज प्रबोधनासह अनेक सामाजिक,शैक्षणिक अभियाने, बालसंस्कार, युवा संस्कार केंद्रांच्या माध्यमातून समाजाला व राष्ट्राला नवी दिशा देण्याचे कार्य करीत आहे.प्रत्येक घर,प्रत्येक माणूस सुखी झाला पाहिजे आणि हिंदुस्थान आपलं राष्ट्र सर्वार्थाने प्रगतीपथावर गेल पाहिजे असा दिव्य संकल्प बाळगून सदगुरु वामनराव पै यांनी 28 ग्रंथांची निर्मिती केली.त्यांच्या ज्ञानाने लाखो लोक सुखी झाले,लाखो लोकांची व्यसने सुटली.लाखो विद्यार्थी शिक्षणामध्ये प्रगती करीत आहेत.त्यामुळे सदगुरूंचे तत्वज्ञान घराघरात जाऊन प्रत्येक घर सुखी झालं पाहिजे असे प्रतिपादन महापौर मंगेश पवार यांनी काढले. अनंत लाड म्हणाले की जीवनविद्येचे तत्त्वज्ञान आचरण्यास सोपं असून ते धर्मातीत व वैश्विक आहे.विश्वाला सुखी करण्याचे सामर्थ्य या ज्ञानामध्ये आहे.लोकांनी या ज्ञानाचा अंगीकार करावा व आपले जीवन सुखी करावे असे त्यांनी विचार मांडले.सदगुरूंनी निर्माण केलेली जीवनविद्या की विज्ञाननिष्ठ असून निसर्गनिमांवर आधारित आहे. त्यामुळे उदी,भस्म,गंडे दोरे यासारख्या अंधश्रद्धांना थारा न देता आपल्या संतांची शिकवण व सदगुरूंचे सखोल चिंतन यातून हे आगळ आणि वेगळं तत्त्वज्ञान निर्माण झालं आहे असे प्रतिपादन डॉक्टर माधव प्रभू यांनी केले.
या रॅलीमध्ये रक्तदान, अवयवदान, बालसंस्कार वर्ग, शेतकरी अन्नदाता, पर्यावरण संरक्षण, बाल शिवाजी, युवा युवतींचा लाठी मेळा,यांचे विविध जीवंत देखावे सादर करण्यात आले होते.या रॅलीत मुस्लिम बांधवांचाही विशेष सहभाग होता.अनेक लहान मुले विविध वेष परिधान करून उत्साहत सहभागी झाली होती.छ. शिवाजी महाराज व मावळ्याच्या
वेषात घोड्यावर बसलेले युवक लोकांचे लक्ष वेधून घेत होते.या रॅलीमध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.तसेच अनेक आजी माजी सैनिक उपस्थित होते.