Spread the love

17 जानेवारी रोजी पाळण्यात येणाऱ्या हुतात्मा दिनाच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई होते. प्रास्ताविक सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले.
बैठकीच्या सुरुवातीस दिवंगत समिती कार्यकर्त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सीमाप्रश्नासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करणे हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य असून हुतात्मा दिनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राजाराम देसाई यांनी केले.
सीमाभागातील विविध समित्या एकत्र येण्यासाठी प्रयत्नशील असलेले युवा समिती सीमाभागचे कार्याध्यक्ष व खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी बैठकीला उपस्थित राहून सीमालढ्यातील पहिले हुतात्मे कै. नागाप्पा होसुरकर यांना अभिवादनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. तसेच सीमाप्रश्नी विरोधी भूमिका घेणाऱ्या शिवसेना (शिंदे गट) बेळगाव जिल्हाध्यक्ष व कार्यकारिणी बरखास्त करण्याची मागणी कोल्हापूर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार धैर्यशील माने यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती दिली.
शुभम शेळके प्रकरणी प्रशासनावर टाकण्यात येणाऱ्या दबावाचा निषेध करत प्रत्येक मराठी माणसाने त्यांच्या पाठीशी उभे राहावे, तसेच युवा समिती सीमाभागतर्फे काढण्यात येणाऱ्या मराठी सन्मान यात्रेला तालुका समितीने सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
माजी आमदार दिगंबर पाटील यांनी सीमाप्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन करत प्रामाणिक युवा कार्यकर्त्यांवरील प्रशासनाचा अन्याय सहन केला जाणार नाही, असे ठणकावले. मुरलीधर पाटील यांनी महाराष्ट्रातील नेत्यांवर टीका करत बेळगाव सीमा भागाबाबत स्पष्ट भूमिका मांडण्याची मागणी केली.
अध्यक्षीय भाषणात गोपाळराव देसाई यांनी हुतात्मा दिन गांभीर्याने पाळून सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले. शहरातील निकृष्ट रस्ता कामाविरोधात पत्रकार दिनकर मरगाळे व विवेक गिरी यांनी पुकारलेल्या उपोषणाला तालुका समितीचा पाठिंबा देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
हुतात्मा दिन जनजागृतीसाठी मंगळवारी जांबोटी, बुधवारी नंदगड व शुक्रवारी कणकुंबी येथे कार्यक्रम होणार असून कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले. बैठकीनंतर खानापूर बाजारात पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली.