बेळगावात संविधान समर्पण दिनानिमित्त भव्य जाथा व व्यासपीठ कार्यक्रम
बेळगाव | भारतीय संविधान निर्मितीच्या ऐतिहासिक वाटचालीचा गौरव साजरा करण्यासाठी कर्नाटक सरकार, जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगरपालिका, समाज कल्याण विभाग आणि विविध दलित संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या बुधवार, दि. 26 नोव्हेंबर 2025 रोजी ‘संविधान समर्पण दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 9.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयापासून संविधान जाथ्याने होणार असून चन्नमा सर्कल मार्गे जाथा पुढे जात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात सांगता होईल. त्यानंतर संविधान मूल्यांवरील व्यासपीठ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी,मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, विधान परिषद सदस्य चनराज हट्टीहोळी, बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ राजू सेठ,बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील,महापौर मंगेश पवार व उपमहापौर विना जोशी,तसेच सर्व आजी–माजी आमदार व निवडून आलेले प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
तसेच प्रादेशिक आयुक्त श्रीमती जानकी के. एम.,पोलीस आयुक्त डॉ. चेतन सिंग राठोड,जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन,पोलीस आयुक्त बोरसे भूषण गुलाबराव,जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर एस. गुलेद,जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे उपस्थित असणार आहेत.
संविधानातील मूल्यांचा प्रसार, सामाजिक ऐक्याची जपणूक व लोकशाहीची ताकद यांवर भर देणारा हा कार्यक्रम बेळगावात भव्य प्रमाणात पार पडण्याची शक्यता असून उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत माहिती देताना दलित नेते मल्लेश चौगुले यांनी सर्व दलित बांधवांनीच नव्हे तर बेळगावातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संविधानाच्या गौरवात आपले योगदान द्यावे, असे आवाहन केले आहे.
या प्रसंगी जीवन कुरणे, प्रवीण मैत्री, संदीप कोलकर, रघु कोलकर आणि कृष्णा कांबळे उपस्थित होते.
