Spread the love

मुतगे : पाच वर्षांतून एकदा मोठ्या भक्तिभावाने साजरी होणारी श्री महालक्ष्मी देवी यात्रा यावर्षीही गावात उत्साहात सुरू झाली आहे. शुक्रवारी पहाटेपासूनच गावातील विविध देवदेवतांची विधीपूर्वक पूजा-अर्चा करण्यात आली. परंपरेनुसार सर्वप्रथम श्री भावकेश्वरी देवीची ओटी भरून त्यानंतर श्री महालक्ष्मी देवीच्या ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला.
या विधीमध्ये बसरी कट्टी येथील देसाई बंधूंना प्रथम ओटी भरण्याचा मान मिळाला. त्यानंतर कुलकर्णी, जैन, चौगुले तसेच आठ पाटील घराण्यांच्या कुटुंबांनी ओटी भरली. यानंतर संपूर्ण गावातील भाविकांनी मंदिरात येऊन मोठ्या श्रद्धेने ओटी भरत भंडाऱ्याची उधळण केली. दुपारी लक्ष्मी गल्लीतील युवकांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते, ज्याचा लाभ अनेक भाविकांनी घेतला.
शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त गाढे मिरवणूक वाजतगाजत काढण्यात येणार असून रविवारी मुख्य यात्रेचा दिवस आहे. या दिवशी दुपारी तीन वाजता कुस्ती स्पर्धा तर रात्री आठ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी गावातील भाविक सौंदत्ती यल्लमा डोंगराकडे प्रस्थान करणार असून मंगळवारी तेथे पडल्या भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. गुरुवारी परतीचा प्रवास करून शुक्रवारी मुतगे येथे पडल्या व प्रसाद कार्यक्रमाने यात्रेची सांगता होणार आहे.
या संपूर्ण धार्मिक सोहळ्याचे आयोजन देवस्थान पंचकमिटी, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आले असून गावकरी आणि भाविक मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत आहेत.