Spread the love

*किल्ले रायगडावरून झाली मराठी सन्मान यात्रेची सुरुवात*

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने मराठी अस्मिता व सीमाप्रश्नी जागृतीसाठी बेळगावसह सीमाभागात मराठी सन्मान यात्रेची घोषणा युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी महिनाभरापूर्वी केली होती.

या मराठी सन्मान यात्रेची सुरुवात स्वराज्याची राजधानी ज्याला मानले जाते तसेच अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन व आशीर्वाद घेऊन सुरुवात करण्याचा संकल्प संघटनेतर्फे करण्यात आला होता. त्या अनुषंगाने 24 जानेवारी 2026 रोजी बेळगावहुन 225 ते 250 कार्यकर्ते हे रायगड रवाना झाले होते.

*दीपक दळवी यांची भेट घेऊन आशीर्वाद*

तत्पूर्वी मध्यवर्ती व घटक समितीच्या व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन उपक्रमाची माहिती देण्यात आली होती, तसेच रोजी प्रकृती अस्वास्थमुळे गेली दोनतीन वर्षे घरीच असल्याने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री.दीपक दळवी यांनी 23 जानेवारी रोजी अध्यक्ष शुभम शेळके,कार्याध्यक्ष धनंजय पाटील,सरचिटणीस मनोहर हुंदरे,उपाध्यक्ष नारायण मुचंडिकर व पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन आशीर्वाद घेतले होते.

दिनांक 25 जानेवारी रोजी महाड येथील बाबासाहेब आंबेडकरांच्या सत्याग्रहाला उजाळा देण्यासाठी व त्यांनी केलेल्या कार्याचा अभिमान राखून त्यांना अभिवादन करण्यासाठी महाड येथील चवदार तळ्याला भेट देण्यात आली,त्यानंतर 26 जानेवारी 2026 रोजी सकाळी किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला भेट देऊन तिथे अभिवादन करण्यासाठी शेकडो कार्यकर्ते सकाळी ठीक 10.30 वाजता रायगडावरील होळीचे माळ येथे जमा झाले. सुरुवातीला होळीचे माळ येथील शिवरायांच्या मूर्तीला अध्यक्ष शुभम शेळके,कार्याध्यक्ष धनंजय पाटील,सरचिटणीस मनोहर हुंदरे,खानापूर समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. इतर सर्व कार्यकर्त्यांनी शिवरायांचे आशीर्वाद घेतले.

शिवरायांना अभिवादन झाल्यानंतर याच ठिकाणी छोट्याशा सभेचे आयोजन करण्यात आले, या सभेच्या दरम्यान शेकडो कार्यकर्त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा आणि परिसर दणाणून सोडला सलग सुट्यांचा काळ आल्याने याठिकाणी महाराष्ट्र व इतर भागातून हजारो पर्यटक याठिकाणी उपस्थित होते कार्यकर्त्यांच्या घोषणांनी त्यांचेही लक्ष याकडे वेधण्यात आले.

कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी मराठी सन्मान यात्रेच्या उपक्रमाची माहिती देतांना 1956 साली भाषांवर प्रांतरचना होताना 40 लाख मराठी माणसांवर झालेला अन्याय उपस्थितांसमोर मांडतांना महाराष्ट्रातील जनतेनेही सीमाभागातील आपल्या लाखो बांधवांच्या पाठीशी एकजुटीने उभे राहावे व हा सीमाप्रश्न लवकरात लवकर सोडवून घेण्यासाठी महाराष्ट्रासह केंद्रसरकारवर दबाव आणण्यासाठी उठाव करावा व उदासीन महाराष्ट्र सरकारला जाग करावे, असे आवाहन केले.

खानापूर समितीचे सरचिटणीस यांनी युवा समिती सीमाभाग व युवकांनी घेतलेल्या मराठी सन्मान यात्रेची संकल्पना ही प्रशंसनीय असून शेकडो मैल दूर असूनही फक्त मराठी अस्मितेसाठी हे युवक शिवरायांच्या आशीर्वादासाठी येथे उपस्थित आहेत याचे कौतुक करून खानापूर समितीचा एक प्रतिनिधी म्हणून आम्ही युवकांच्या पाठीशी आहोत असे आश्वासन दिले.

बिदर तालुका समिती अध्यक्ष व युवा समिती सीमाभागचे कार्याध्यक्ष दिनेश मुधाळे यांनी ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली युवकांनी आता सीमाप्रश्नी पेटून उठले पाहिजे, यासाठी बिदरही कुठे कमी पडणार नाही असे सांगितले.

बेळगाव युवा सेनेचे विनायक हुलजी हे शिवप्रतिष्ठानच्या गडकोट मोहिमेवरून आपल्या सहकाऱ्यासमवेत थेट रायगडावरील मराठी सन्मान यात्रेत सहभागी होऊन त्यांनी आपला पाठिंबा जाहीर करताना शिवसेना व युवा सेना कायमच सीमावासीयांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.

अध्यक्ष शुभम शेळके यांनी उपस्थितीतांसमोर 1956 साली तात्कालीन केंद्र सरकारने कसा अन्याय केला व कर्नाटक सरकार आपल्या जुलमी भाषिक अत्त्याचाराने सीमावासियावर कशी कन्नड सक्ती करते याचा सविस्तर वृत्तांत सांगतांना इथे आम्ही कुठल्याही भाषेचा द्वेष करत नसून आम्ही आमची भाषा व संस्कृती मागतोय यात गैर काय असा सवाल उपस्थित केला व यापुढेही युवक मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अधिपत्याखाली कसा एकवटले व या चळवळीला बळकटी कशी येईल यासाठी आम्ही युवा समिती सीमाभाग म्हणून कार्य करत राहू व त्याचाच एक भाग म्हणून शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वादासह सीमाभागात मराठी सन्मान यात्रेची सुरुवात करत आहोत, लढा… नाहीतर गुलामीची सवय होईल ही घोषणा देत आहोत व यातून युवक नक्कीच जागृत होईल असे आश्वासन दिले.

या नंतर होळीचे माळ येथून येळ्ळूर भजनी मंडळाच्या अभंगांच्या गजरात शिवकालीन बाजारपेठेतून मिरवणूक काढण्यात आली यामध्ये सीमालढयातील पहिल्या पिढीपासून ते चौथ्या पिढीचे बालकही सामील होते. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या समाधीचे दर्शन घेऊन तेथील पवित्र मातीचे संकलन करून सीमाप्रश्नी एकजुटीची शपथ घेण्यात आली.

या फेरी दरम्यान पुन्हा एकदा कार्यकर्त्यानी छत्रपती शिवाजी महाराज की जय, बेळगाव, कारवार,निपाणी बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्राच्या व बेळगाव आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे या घोषणा देत बेळगाव कसे आपले आहे हे तेथील पर्यटकानाही कार्यकर्ते वैयक्तिकरित्या जागृती करत होते. मुंबई घाटकोपर,पुणे,जळगाव,नाशिक,
कोल्हापूर, खानदेश,सातारा,सांगली व महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या पर्यटकांनीही सीमाशीयांच्या पाठीशी असल्याचे व मराठी सन्मान यात्रेला शुभेच्छा दिल्या.

सभेचे सूत्रसंचालन महादेव पाटील तर आभार युवा समिती सीमाभागचे सरचिटणीस मनोहर हुंदरे यांनी केले.

या मोहिमेत व कार्यक्रमावेळी संघटनेचे खजिनदार व नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले, उपाध्यक्ष नारायण मुचंडीकर,अशोक घगवे,श्रीकांत नांदुरकर,शिवाजी हावळाणाचे, सुरज जाधव,सचिन दळवी,ऍड.वैभव कुट्रे,भूपाल पाटील,मोतेश बारदेशकर, राजू पाटील,रमेश माळवी, प्रकाश हेब्बाजी,आनिल वाडेकर,महेंद्र जाधव, किरण धामणेकर,दीपक कोले,स्वप्निल पाटील,पत्रकार नरेश पाटील, जोतिबा यळूरकर,अरुंधती दळवी,तेजस्विनी दळवी,गंधार उमेश पाटील,यथार्थ, विनायक मजुकर,अमोल चौगुले,ओमकार बैलूरकर,उमेश पाटील,सुशांत देसाई,शिवराज यलजी,चौथ्या पिढीचे आदेश हुंदरे,प्रणव घगवे,श्रीशंभु मंडोळकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.