Spread the love

राज्याच्या महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना अश्लील अपशब्द उच्चारल्याचा आरोप असलेल्या आमदार सी. टी. रवी यांच्या निषेधार्थ आणि त्यांची आमदार पदावरून हकालपट्टी करावी,,

या मागणीसाठी बेळगाव ग्रामीण मतदार संघातील हेब्बाळकर यांच्या समर्थकांनी आज शनिवारी सकाळी राणी चन्नम्मा सर्कल येथे उग्र आंदोलन छेडले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणि सी. टी. रवी यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. तसेच भर चौकात त्यांच्या प्रतिकृतीचे दहन करून संताप व्यक्त करण्यात आला.

विधानपरिषद सदस्य सी. टी. रवी यांनी आपल्याला अश्लील अपशब्दानी संबोधित केल्याची तक्रार राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी परवा विधान परिषद सभागृहात केल्यामुळे राज्यातील काँग्रेस व भाजप यांच्यात मोठा संघर्ष उडाला आहे.
या पार्श्वभूमीवर मंत्री हेब्बाळकर यांचा मतदारसंघ असलेल्या बेळगाव ग्रामीणमधील त्यांच्या समर्थकांनी सी. टी. रवी यांच्या विरोधात तसेच राज्यपालांनी त्यांच्या आमदार पदाचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी आज शनिवारी सकाळी उग्र आंदोलन छेडले. शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे आज शनिवारी शेकडोच्या संख्येने जमलेल्या या समर्थकांनी हातात निषेधाचे फलक आणि बॅनर घेऊन आमदार रवी यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करत त्यांचा धिक्कार केला.
या आंदोलनामध्ये महिला समर्थकांची संख्या लक्षणीय होती. ग्रामीण भागातील महिलावर्ग हिरीरेने आंदोलनात सहभागी झाल्याचे पहावयास मिळत होते. आंदोलनाप्रसंगी मंत्री हेब्बाळकर यांच्या संतप्त समर्थकांनी निदर्शने करत सी. टी. रवी यांच्या प्रतिकृतीची तिरडीवरून अंत्ययात्राही काढली. त्याचप्रमाणे चिडलेल्या महिलावर्गांने आमदार रवी यांच्या छायाचित्राला चपलेने मारून आपला संताप प्रकट केला. यावेळी राणी चन्नम्मा चौकात आमदार सी. टी. रवी यांच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. त्यानंतर आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने जाऊन निवेदन सादर केले.
आंदोलन स्थळी बेळगाव लाईव्हशी बोलताना बेळगाव ग्रामीण मतदार संघातील हेब्बाळकर समर्थक ज्येष्ठ काँग्रेस नेते युवराज कदम यांनी आज छेडण्यात आलेल्या आंदोलनाचा उद्देश स्पष्ट केला. आमच्या भागाच्या आमदार व राज्याच्या मंत्री हेब्बाळकर यांना अश्लील शब्द उच्चारून आमदार सी. टी. रवी यांनी संपूर्ण महिलावर्गाचा अपमान केला आहे. त्यांना प्रायश्चित दिले जावे, या मागणीसाठी मंत्री हेब्बाळकर यांच्या समर्थकांसह हितचिंतकांनी आज स्वयंस्फूर्तीने हा मोर्चा काढला आहे. त्याचप्रमाणे जोपर्यंत राज्यपाल व राष्ट्रपतींकडून सी. टी. रवी यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत आमचे हे आंदोलन असेच सुरू राहणार आहे, अशी माहिती कदम यांनी दिली.