सामाजिक व धार्मिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सर्व लोकसेवा फाउंडेशनच्या सेवेला आता आणखी बळ मिळाले आहे. बसवण कुडची येथील निळकंठय्या राचय्या हिरेमठ शास्त्री यांनी फाउंडेशनला एक नवीन रुग्णवाहिका भेट दिली आहे.
या रुग्णवाहिकेचा पूजन सोहळा नुकताच पार पडला. यावेळी निळकंठय्या हिरेमठ शास्त्री यांनी फाउंडेशनचे अध्यक्ष वीरेश हिरेमठ यांच्याकडे रुग्णवाहिकेच्या चाव्या सुपूर्त केल्या. या उपक्रमात प्रशांत घोडके आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
वीरेश हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली फाउंडेशनकडून हिंदू देवतांच्या भग्न मूर्तींचे संकलन आणि गरजूंसाठी रुग्णसेवा असे कार्य होत आहे. नवीन रुग्णवाहिकेमुळे या सेवेला वेग आणि विस्तार मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करताना, “ही मदत आमच्यासाठी मोलाची आहे, पण त्यासोबतच आमची जबाबदारीही वाढली आहे,” अशी प्रतिक्रिया अध्यक्ष वीरेश हिरेमठ यांनी दिली.
हिरेमठ शास्त्री यांनी देखील, “ही रुग्णवाहिका समाजसेवेसाठी समर्पित केली आहे. फाउंडेशनच्या कार्यात ती उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा आहे,” असे नमूद केले.

