बेळगाव :
नीट परीक्षेत गुण वाढवून देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक करणाऱ्या मूळच्या हैदराबादच्या अरविंद आलियास अरुण कुमार नामक व्यक्तीला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. तब्बल १.८ कोटी रुपयांची त्याने फसवणूक केली असून नीट परीक्षा घोटाळ्यात गुंतलेल्या राज्यस्तरीय रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
यासंदर्भात आज मार्केट पोलीस स्थानकात बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डीसीपी रोहन जगदीश यांनी माहिती दिली. बेळगाव मार्केट पोलिसांनी हि मोठी कारवाई केली असून आरोपीकडून १२ लाख रुपये रोख रकमेसह १५ संगणक, ५ मोबाईल तसेच लॅपटॉप आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये मार्केट पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार हि कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
बेळगावमधील अनेक विद्यार्थ्यांची या आरोपीने फसवणूक करत जवळपास एक कोटी आठ लाख रुपयांची लुबाडणूक केली होती. नीट परिक्षेत कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना एमबीबीएसला ऍडमिशन मिळवून देण्याचे आमिष दाखवत अनेकांना लाखोंचा गंडा त्याने घातला होता.
त्याने मुंबई येथे कौन्सिलिंग करियर अकादमीची स्थापना केली होती. यापूर्वी त्याच्यावर हैद्राबाद, बेंगळुरू, भोपाळ – मध्यप्रदेश आदी ठिकाणी विविध तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
त्याची पार्श्वभूमी तपासत एकंदर प्रकरणाचा तपास घेत मार्केट पोलिसांनी मोठी कारवाई केली असून या पद्धतीने नीट परीक्षा घोटाळ्यात गुंतलेल्या राज्यस्तरीय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.