Spread the love

बेळगाव:

बेळगाव शहर आणि परिसरात अनेक देवी देवतांची मंदिरे आहेत. या मंदिरांना अनेक वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभली असून हजारो भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या शहरातील मंदिरांमध्ये नवरात्री उत्सव काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते तसेच प्रत्येक मंदिराची वेगवेगळी परंपरा आहे. त्यामुळे शहर आणि परिसरातील भाविकांची शक्तीपीठे असणाऱ्या मंदिरांचा नवरात्री निमित्याने घेण्यात आलेला आढावा पुढीलप्रमाणे

….
बेळगाव शहर आणि परिसरातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळख असणाऱ्या पाटील गल्ली वडगाव येथील मंगाई देवी शहर आणि परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिरामध्ये पारंपारिक पद्धतीने नवरात्रीमध्ये घटस्थापना करण्यासह इतर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते तसेच मंदिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आरास तयार केली जाते त्यामुळे देवीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सव काळात भाविक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.

मंगाई देवी मंदिराला सतराव्या शतकापासूनचा इतिहास लाभला आहे. तसेच शेतकरी आणि कष्टकऱ्यांची देवी म्हणून मंगाई देवीला ओळखले जाते. चांगला पाऊस पडावा आणि सर्वत्र सुख समाधान निर्माण व्हावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडते. सुरुवातीला मंदिर अतिशय लहान होते मात्र स्वातंत्र्यपूर्व काळात 1920 मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आल्याची माहिती या भागातील जुन्या जाणत्या लोकांतून दिली जाते. दर मंगळवारी व शुक्रवारी देवीच्या दर्शनासाठी आणि नवस फेडण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे मंदिर परिसरात नेहमीच नागरिकांची गर्दी पहावयास मिळते. नवसाला पावणारी देवी म्हणून श्रद्धा असल्याने अनेक जण नवस मागण्यासाठी आणि फेडण्यासाठी सातत्याने मंदिरात येऊन गाऱ्हाणे घालत असतात तसेच दरवर्षी जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात देवीची यात्रा मोठ्या प्रमाणात भरते. तसेच यात्रोत्सवापूर्वी एक महिना अगोदर पारंपारिक पद्धतीने गाऱ्हाणे घातले जातात तसेच यात्रेसाठी वार घातल्यानंतर पारंपारिक पद्धतीने वारांची पाळणुक केली जाते. वडगाव परिसरातील कुमारिका वारादिवशी विविध भागातील देवदेवतांना पाणी वाहतात तर यात्रेच्या मुख्य दिवशी गाऱ्हाणे उतरविल्यानंतर औटी भरण्यास सुरुवात होते. काही वर्षांपूर्वी फक्त एक दिवस यात्रा भरत होती मात्र गेल्या दहा ते बारा वर्षांपासून पाच ते सहा दिवस यात्रा काळात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मंदिरात घट पुजविला जातो. तसेच दररोज आकर्षक आरास केली जाते. तर विजया दशमी दिवशी जूने बेळगाव येथील कलमेश्वर देवाची पालखी मंदिरामध्ये येते. अशी माहिती मंदिरातील पुजाऱ्यांनी दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून मंदिर परिसरात अनेक विकास कामे हाती घेण्यात आली आहेत त्यामुळे मंदिर परिसराच्या सौंदर्यात भर पडत आहे.