चन्नम्मांचा इतिहास सर्वांना कळवा हा कित्तूर उत्सवाचा उद्देश – मंत्री सतिश जार्किहोळी कित्तूर राणी चन्नम्मा यांच्या विजयाच्या द्विशताब्दी वर्षाचा विजयोत्सव आणि राणी चन्नम्मा यांचा इतिहास संपूर्ण देशाला कळावा या उद्देशाने कित्तूर उत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. हा उत्सव चन्नम्मा यांच्या ऐतिहासिक लढ्याचे महत्त्व विशद करणारा आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले.
वीर राणी कित्तूर चन्नम्मा यांचे जन्मगाव असलेल्या बेळगाव शहराजवळील काकती गावांमध्ये आज बुधवारी सकाळी कित्तूर उत्सव -2024 आणि राणी चन्नम्मा यांच्या विजयोत्सवाचे 200 वे वर्ष साजरे करणाऱ्या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलनाने उद्घाटन केल्यानंतर उद्घाटक या नात्याने मंत्री जारकीहोळी बोलत होते.
काकती येथून राणी चन्नम्मा यांच्या इतिहासाला प्रारंभ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी कित्तूर उत्सवाचा काकती येथे सांकेतिक प्रारंभ केला जातो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक महान क्रांतीकारांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यामध्ये कित्तूर राणी चन्नम्मा या अग्रभागी होत्या. ब्रिटिशांविरुद्ध कडवा लढा देऊन स्वतःचे राज्य आणि देशासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या कित्तूर राणी चन्नम्मा यांचा इतिहास प्रत्येकाला कळावा हा सदर उत्सव आयोजित करण्यामागचा मुख्य उद्देश आहे.
पुढील दिवसांमध्ये अन्य तालुक्यांमध्ये देखील कित्तूर उत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. याबरोबरच कित्तूर आणि काकतीच्या विकासासाठी पावले उचलली जातील, असे जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी पुढे सांगितले.
यावेळी सिद्धू सूणगार, अय्यप्पा कोळकर आणि एस. डी. पाटील या उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला विशेष पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉ. गुरुदेव हुलेप्पणावरमठ यांनी आपल्या भाषणात राणी चन्नम्मा यांचा इतिहास थोडक्यात सांगून त्यांच्या योगदानाची माहिती दिली.
त्याचप्रमाणे आजच्या कित्तूर उत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाला मुक्ती मठाचे श्री शिवसिद्ध सोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी आणि काकती येथील उदय स्वामीजी यांचे दिव्य सानिध्य लाभले होते. त्यांची देखील आशीर्वादपर भाषणे झाली.
कार्यक्रमास बेळगावचे आमदार असिफ (राजू) सेठ, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, ग्रा. पं. अध्यक्ष वर्षा मुचंडीकर, गॅरंटी योजनांचे जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, जि. पं. सीईओ राहुल शिंदे, बेळगाव उपविभागीय अधिकारी श्रवण नायक आदींसह काकती उत्सव समितीचे पदाधिकारी, सदस्य, गणमान्य मंडळी आणि नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.