*कॅन्सर लसीकरण व अनाथांच्या शिक्षणासाठी रोटरी क्लब ऑफ बेलगाम साउथचा चॅरिटी शो “द दमयंती दामले’*
बेळगाव : समाजहितासाठी विविध उपक्रम राबवणाऱ्या रोटरी क्लब ऑफ बेलगाम साऊथ यांच्या वतीने सांस्कृतिक आणि सामाजिकतेचा संगम घडवून आणणारा एक वेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे. मंगळवार, दि. ९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता के.एल.ई. संकुलातील डॉ. बी. एस. जिर्गे सभागृहात ‘द दमयंती दामले’ हा चॅरिटी शो आयोजित करण्यात आला आहे.
गेल्या ३५ वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ बेलगाम साऊथ सामाजिक बांधिलकी जपत तळागाळातील लोकांसाठी सातत्याने कार्यरत आहे. या चॅरिटी शोमधून जमा होणारा निधी कोविड काळात पालक गमावलेल्या अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी तसेच महिलांसाठी गर्भाशय मुखाच्या कॅन्सरच्या लसीकरणासाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे हा उपक्रम केवळ मनोरंजनापुरता न राहता समाजासाठी उपयुक्त ठरणारा आहे.
नाटकाची कथा कौटुंबिक आणि विनोदी असून प्रेक्षकांना हसवणारी, विचार करायला भाग पाडणारी आणि अखेरीस जीवनमूल्यांची जाणीव करून देणारी आहे. या नाटकाचे निर्माते नितीन भालचंद्र नाईक, कथानक इम्तियाज पटेल, तर लेखक-दिग्दर्शक संतोष पवार आहेत. विशाखा सुभेदार, पल्लवी वाघ-केळकर, संजीव तांडेल, वैदेही करमरकर, सागर खेडेकर, क्षितिज भंडारी, तन्ची ठाकूर आणि दिनेश रिकामे या लोकप्रिय कलाकारांच्या दमदार अभिनयाने सजलेले हे नाटक मुंबईसह अनेक ठिकाणी गाजले असून बेळगावकरांसाठीही आनंदाचा सोहळा ठरणार आहे.
प्रतेकाने आपल्या क्षमतेनुसार योगदान देऊन या सामाजिक कार्याला हातभार लावू शकतो.
देणगी प्रवेशिकांसाठी संपर्क क्रमांक : 9740409797, 9880353855, 9422044429, 9448634658.
रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ.गोविंद मिसाळे व पदाधिकाऱ्यांनी बेळगावकरांना आवाहन केले आहे की, या “सांस्कृतिक आनंदाचा आस्वाद घेताना समाजहितासाठी हातभार लावा” आणि या उपक्रमाला यशस्वी करा.
